पुणे विभागात रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातामुळे दगावणाऱ्यांची संख्या वाढली

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. 2020 सालच्या तुलनेत हे प्रमाण 2021 आणि 2022 साली वाढल्याचे दिसून आले होते. या वर्षीदेखील हा आकडा वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. यावर्षी रुळ ओलांडताना झालेल्या अपघातात मध्य रेल्वे क्षेत्रात 600 जणांचा बळी गेला आहे. गेल्यावर्षी मध्य रेल्वे क्षेत्रात 1250 जण दगावले होते त्यातील 318 जण हे पुणे विभागातील होते.

“बालासोर ट्रेन दुर्घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरक्षा आणि सुरक्षेवर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मात्र रेल्वे रूळ ओलांडून जाणे थांबवण्यासाठी फारसा विचार केलेला दिसत नाही. त्यामुळेच मृतांची वाढत चालली आहे.” असे पुणे-दौंड-पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष विकास देशपांडे यांनी म्हटले आहे.

2020 साली जेवढे मृत्यू पुणे विभागात झाले होते तेवढे मृत्यू या वर्षी जुलै 2023 पर्यंत झाले आहेत. अपघातात जखमींची संख्या देखील 2020,2021 च्या तुलनेत यावर्षी जास्त आहे. रेल्वे बोर्डाने रुळावर गाई-गुरे येऊ नयेत, प्रवाशांनी रुळ ओलांडू नयेत यासाठी 41 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुणे विभागाला यातून 214 कोटी रुपये मिळाले आहेत. पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी रामदास बिसे यांनी सांगितले की या रकमेतून गाई-गुरे किंवा प्रवाशांना रुळावर येता येऊ नये यासाठी कुंपण घालण्यात येणार आहे. याशिवाय ज्या ठिकाणी अपघात जास्त होतात तिथे सबवे तयार करण्याचेही काम करण्यात येणार आहे. तातडीची उपाययोजना म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांनी आरपीएफ जवानांना रुळ ओलांडण्याचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय रुळाजवळ राहणाऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे (DRUCC) सदस्य निखिल काची यांनी सांगितले की, सप्टेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या DRUCC बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हे देखील रुळ ओलांडून जाण्याचे आणि त्यामुळे होणारे अपघात वाढण्याचे कारण आहे. ही अतिक्रमणे हटविण्याबाबत रेल्वेने आरपीएफ आणि पुणे महानगरपालिकेशी समन्वय साधून कारवाई केली पाहिजे. पुणे-मुंबई नियमितपणे प्रवास करणाऱ्या करुण साबळे यांनी म्हटले की, रुळ ओलांडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे आणि नियम मोडणाऱ्यांना जबर दंड ठोठावला पाहिजे. याशिवाय रेल्वे रुळांवर व्हिडीओ काढणाऱ्या रिल बनविणाऱ्या तरुणांवरही वचक बसवला पाहिजे.