
गुंतवणूकदार आणि उद्योगपतींनी शेअर्सच्या किमतीत दररोज होणाऱ्या चढ-उताराकडे ध्यान देण्याऐवजी लाभदायक आणि टिकाऊ व्यापार उभा करण्यावर फोकस करावा, असे आवाहन एनएसइचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान यांनी सांगितले. स्टार्टअप आणि छोटे उद्योगपती यांनी आपल्या व्यापाराचा विस्तार करण्यासाठी शेअर बाजारात सूचिबद्ध होणाऱ्या पब्लिक लिस्टिंगकडे एक रणनीती म्हणून पाहा, असेही ते म्हणाले. एनएसईमध्ये आयोजित जेआयआयएफच्या स्थापना दिवस कार्यक्रात ते बोलत होते.
गेल्या नऊ वर्षांत जेआयआयएफ (JIIF) एका छोट्या कल्पनेपासून समाजातील अत्यंत प्रभावी उद्योजकता आणि नाविन्यता (इनोव्हेशन) प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून विकसित झाले आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही चार इनक्युबेशन कोहॉर्ट्स यशस्वीरित्या पूर्ण केले असून स्टार्टअप्समध्ये ६० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी मदत केली आहे. तसेच आम्ही २० पेक्षा जास्त इकोसिस्टम भागीदारांचे जाळे तयार केले असून ३० हून अधिक राष्ट्रीय आणि प्रादेशिक संस्थांसोबत भागीदारी केली आहे, असे JIIF चे चेअरमन जीनेंद्र भंडारी म्हणाले.
जीनेंद्र भंडारी यांनी सांगितले की, या फाउंडेशनने ५ कोटी रुपयांचे एमएसआयएनएस (MSInS) अनुदान आणि २ कोटी रुपयांचे एसआयएसएफएस (SISFS) अनुदान मिळवले आहे, तर त्यांच्या स्टार्टअप्सनी तीन पूर्ण आणि तीन अंशतः गुंतवणुकीचे यश संपादन केले आहे. आपल्या फ्लॅगशिप इन्व्हेस्टर एंगेजमेंट प्लॅटफॉर्मच्या चार आवृत्त्या आणि मुंबईत ५,००० स्क्वेअर फूटच्या इनक्युबेशन सेंटरची झालेली सुरुवात यांसारख्या उपक्रमांमुळे नवसंशोधन आणि उद्योजकतेच्या परिसंस्थेला सातत्याने बळकटी मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.































































