कांदा व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद, 40 टक्के निर्यात शुल्काला विरोध

onion-market

कांदा व्यापारी संघटनेने बंदची हाक दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या संघटनेने जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आजपासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लादले असून त्यामुळे कांदा व्यापारी व निर्यातदारांना याचा फटका बसणार असल्याचे या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर आणि राज्यात दुष्काळाचे सावट असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद राहिल्याने शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. या बंदमुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

एकीकडे कांद्यातून मिळणारे उत्पन्न हे फारच कमी आहे. उत्पादनासाठी लागणारा खर्चही त्यातून निघत नाही. ही परिस्थिती थोडी सुधारत असताना केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे कांद्याचे दर पडले असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाच्या लहरीपणाचाा फटकाही शेतकऱ्यांना बसला असून कांद्याच्या पिकावर त्याचा परिणाम झाला आहे. कांद्याची गुणवत्ता घसरल्याने त्याला म्हणावी तशी मागणी मिळत नाहीये. कांदा सडण्यापेक्षा तो आहे त्या दराला विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे, ज्याचा त्यांना फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर जर लिलाव बंद झाला तर कांद्याची रोजची 30 कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प होईल.