खंडणी प्रकरणातील आरोपींकडे सापडली 200 हून अधिक ईडी प्रकरणांची कागदपत्रे

164 कोटींच्या खंडणी प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरुवात करताच काही धक्कादायक बाबी उजेडात येण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 6 जमांना अटक केली असून आता पोलिसांनी अंमलबजावणी संचलनालयातील (ED) एका व्यक्ती विरोधातही गुन्हा नोंदवला आहे. तपासादरम्यान पोलिसांना ईडी तपास करत असलेल्या 200 प्रकरणांची कागदपत्रे आरोपींकडून मिळाली आहेत. पोलिसांना संशय आहे की ईडी तपास करत असलेल्या प्रकरणांमधील संशयित आरोपींना धमकावून त्यांच्याकडूनखंडणी उकळण्याचा या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा प्रयत्न होता. आरोपींना आतापर्यंत 100 कोटी रुपयांची खंडणी उकळली असल्याचा पोलिसांना संशय आहे.

खंडणीप्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी, ईडीतील त्यांच्या खास माणसाकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्या-त्या प्रकरणातील संशयिताशी संपर्क साधायचे आणि त्याच्याकडे खंडणी मागायचे. हे आरोपी आपल्याला खंडणी दिल्यास ईडीचे त्याच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ निघून जाईल, त्यासाठी आपली ईडीमध्ये सेटींग आहे असे सांगत असावेत असा पोलिसांना संशय आहे.

जानेवारी महिन्यात पोलिसांनी एका टोळीला अटक केली होती. रमेश भगत उर्फ रोमी भगत हा या टोळीचा म्होरक्या आहे. भगतचे अधिकारी आणि राजकारण्यांशी लागेबांधे आहेत. त्याचा वापर तो गुंतागुंतीची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी करत होता.

अंधेरी डी.एन.नगरमधल्या एका बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यात त्याने म्हटले होते की त्याच्या प्रतिस्पर्ध्याने त्याच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली आहे. ही तक्रार दाखल होताच या व्यावसायिकाला अज्ञात माणसांनी फोन करायला सुरुवात केली होती. फोन करणाऱ्याने व्यावसायिकाला ईडी कारवाई करेल अशी भीती घातली होती. हे प्रकरण सोडवायचे असेल तर आम्हाला येऊन भेट असे फोन करणाऱ्याने सांगितले होते. त्यानुसार हा व्यावसायिक आरोपींना भेटला होता.

आरोपींनी व्यावसायिकाकडून 164 कोटींची खंडणी मागत त्याला धमकावले होते. या भेटीच्यावेळी उपस्थित असलेला एक माणूस हा ईडीचा असल्याचे या व्यावसायिकाला सांगण्यात आले होते. तो माणूस कोण आहे हे शोधून काढण्याचे काम पोलीस करत आहेत. आरोपींकडे सापडलेल्या कागदपत्रांमध्ये महादेव बेटींग अॅप प्रकरणाच्या, डाबर समूहाविरोधातील तक्रारीच्या कागदपत्रांचा समावेश आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.