हे असहकार आंदोलन! 14 न्यूज अँकर्सवरील बहिष्काराचं काँग्रेस नेत्याकडून समर्थन

वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमातून केंद्रातील सत्ताधारी भाजपचा राजकीय अजेंडा राबविणाऱ्या ‘गोदी मीडिया’पासून दूर राहण्याचा निर्णय ‘इंडिया’ आघाडीने घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता या निर्णयाबाबत काँग्रेस नेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

देश व समाजात फूट पाडण्याचे कार्यक्रम घेणाऱ्या, ठरावीक राजकीय अजेंडा राबविणाऱ्या अँकर्सच्या शोमध्ये सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय इंडियाच्या समन्वय समितीने घेतला होता. त्यानुसार ‘इंडिया’च्या माध्यम विषय समितीने 14 वादग्रस्त अँकरची यादी जाहीर केली होती. हा निर्णय योग्य असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी केलं आहे. गोदी मीडियावर हा बहिष्कार नसून हे असहकार आंदोलन असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

पवन खेरा याबाबत बोलताना म्हणाले की, आम्ही या अँकर्सना बॉयकॉट, बॅन किंवा ब्लॅक लिस्ट केलेलं नाही. हे एक असहकार आंदोलन आहे. आम्ही समाजात द्वेष पसरवणाऱ्या कुठल्याही व्यक्तिला सहकार्य करणार नाही. ते आमचे शत्रू नाहीत किंवा हा निर्णयही काही चिरंतन नाही. जर उद्या त्यांना ही जाणीव झाली की ते जे करत होते, ते देशासाठी चांगलं नव्हतं, तर आम्ही पुन्हा त्यांच्या कार्यक्रमात जायला सुरुवात करू, असं पवन खेरा यांनी स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीने द्वेष पसरवणाऱ्या आणि मोदींचा उदो उदो करणाऱ्या 14 न्यूज अँकर्सची यादी जाहीर केली होती. या टीव्ही अँकर्सच्या यादीत अदिती त्यागी, अमन चोप्रा, अमिश देवगण, आनंद नरसिम्हा, अर्णब गोस्वामी, अशोक श्रीवास्तव, चित्रा त्रिपाठी, गौरव सावंत, नाविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव आरूर, सुधीर चौधरी आणि सुशांत सिन्हा यांचा समावेश आहे.