पियुष गोयल यांना मुंबईतून उमेदवारी मिळणार ? गोपाळ शेट्टी यांच्या पोटात गोळा

केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना मुंबईतून उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तर मध्य किंवा उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे. उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन खासदार म्हणून निवडून आल्या आहेत तर उत्तर मुंबईतून भाजपचे गोपाळ शेट्टी खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. हे दोन्ही मतदारसंघ भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ मानले जात असल्याने या दोन मतदारसंघांपैकी एकातून गोयल यांना उमेदवारी दिली जाईल असे सांगितले जात आहे.

2019 साली झालेल्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता तर पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. गोयल यांच्याकडे केंद्रात महत्त्वाची खाती आहे, गोयल हे लोकांमधून निवडून आलेले खासदार म्हणजेच लोकसभा खासदार नसून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांना लोकांमधून निवडून आलेले खासदार बनविण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. गोयल यांच्यासाठी उत्तर मध्यऐवजी उत्तर मुंबई हा अधिक सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवताना काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा 4 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. ‘स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्चनांची भूमिका नव्हती. कारण ख्रिश्चन म्हणजे ब्रिटिशच होते’, ‘शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन’ अशी वादग्रस्त विधाने शेट्टी यांनी केली होती ज्यामुळे ते वादात सापडले होते. गेल्या वर्षी शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मुलीने कबड्डीत सुवर्णपदक पटकावल्यानंतर तिला देण्यात आलेल्या एक कोटी रूपयांवरून टीका केली होती. त्यांच्या या विधानांमुळे भाजपचे वरिष्ठ त्यांच्यावर नाराज असल्याचे कळते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पूनम महाजन यांच्याऐवजी गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी गोयल यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.