चाणक्यालाही दिसण्यावरून केले होते ट्रोल…प्राची निगमचे टीकाकारांना सडेतोड उत्तर

उत्तर प्रदेशात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 98.5 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावणारी प्राची निगम तिच्या कामगिरीपेक्षा तिच्या दिसण्यामुळे जास्त चर्चेत आली. अनेकांनी तिला दिसण्यावरून ट्रोल केले. प्राचीच्या चेहऱयावर जास्त केस असल्याने ती मुलगा असल्याचे अनेकांनी उपहासाने म्हटले. या टीकाकारांना उत्तर देताना प्राची म्हणाली, माझे गुण महत्त्वाचे आहेत, चेहऱयावरचे केस नव्हे. ज्यांना माझ्या चेहऱयावर केस असणे विचित्र वाटत आहे, ते मला ट्रोल करणे सुरू ठेवतील. पण यामुळे मला काहीच फरक पडत नाही. चाणक्य यांच्यावरही दिसण्यावरून टीका करण्यात आली होती. पण यामुळे त्यांना काहीच फरक पडला नाही.

टीकाकारांना सडेतोड उत्तर देतानाच प्राचीने तिला पाठिंबा देणाऱयांचे आभार मानले. ट्रोलिंगमुळे थोडे वाईट वाटल्याचेही तिने सांगितले. पण सोशल मीडियावर लोक हवे ते लिहीत असतात आणि आपण त्याबद्दल काहीही करू शकत नाही. मला थोडे कमी मार्क मिळाले असते तर कदाचित सोशल मीडियावर इतकी प्रसिद्धी झाली नसती. मला कदाचित चेहऱयावरील केसांमुळे ट्रोलिंग सहन करावे लागले नसते, असे प्राचीने म्हटले. तिने मोठे होऊन इंजिनीअर व्हायची इच्छा व्यक्त केली.

प्राची निगमचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काहींनी चेहऱयावरील केसामुळे तिची खिल्ली उडवली होती. काहींनी तिच्या यशाचे कौतुक केले. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी प्राचीशी संवाद साधला आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.