ब्रिटिशही हिंदुस्थान काँग्रेसमुक्त करू शकले नाहीत; मोदी काय करणार

अदानीच्या पैशाने काँग्रेसला हरवण्याचे, हिंदुस्थानला काँग्रेसमुक्त करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहत आहेत. मात्र त्यांनी लक्षात ठेवावे की, जगातील सर्वात शक्तिशाली ब्रिटिशांची सत्ता हिंदुस्थान काँग्रेसमुक्त करू शकली नाही. आम्ही ब्रिटिशांनाच हिंदुस्थानमधून पळून जायला लावले, तिथे मोदी काय देश काँग्रेसमुक्त करणार, असा सणसणीत टोला काँगेस नेते खासदार राहुल गांधी यांनी लगावला.

काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भकन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल गांधी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याकेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भाजपच्या विद्वेषी राजकारणाचा समाचार घेतला. अदानीने भ्रष्टाचारी मार्गाने हिंदुस्थानात भरपूर संपत्ती कमावली. या संपत्तीतूनच अदानीने देशातील विमानतळ, रेल्वे, खाणी, वीज, बँका विमा कंपन्या विकत घेतल्या. आता अदानी धारावीला संपवण्याचे काम करत आहेत. पण त्यांना धारावी समजलेली नाही. काँग्रेस पक्ष धारावी संपवी देणार नाही, असा विश्वासही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.

तर कुणीही आपला पराभव करू शकणार नाही खरगे

यावेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदी व त्यांच्या लोकांनी कटकारस्थान करून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी सातत्याने गरिबांचा आवाज उठवत होते, बेरोजगारीवर आवाज उठवत होते, मोदींविरुद्ध आवाज उठवत होते म्हणून त्यांचा आवाज बंद करण्यासाठी खासदारकी रद्द करण्यात आली, पण राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करावी लागली. ते आता पुन्हा संसदेत आले आहेत. मोदी दिल्लीहून कर्नाटकाच्या गल्लीबोळात फिरले, पण कर्नाटकची जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडली नाही. आपण सर्वजण एक होऊन लढलो तर कोणीही आपला पराभव करू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.