पाऊस परतला… मुंबईत सरीवर सरी ! आज ‘यलो अलर्ट’, कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दहा दिवसांपासून दडी मारलेला पाऊस अखेर पुन्हा डेरेदाखल झाला आहे. मुंबईत दुपारपासूनच पावसाच्या सरीवर सरी कोसळायला सुरुवात झाली असून कोकणासह मध्य महाराष्ट्र, घाट प्रदेशात मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. मुंबईत उद्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून कोकणासह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून खबरदारीचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

जूनपर्यंत गायब असणाऱ्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. यानंतर गेले दहा ते बारा दिवस पावसाने पाठ फिरवली होती. मात्र बंगालच्या उपसागरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे २० जुलैपासून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने आजपासूनच जोरदार कमबॅक केले आहे. मुंबई शहरासह उपनगरात दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.

 

सोमवारपासून जोर वाढणार
जुलैच्या सुरुवातीलाच मुंबईसह संपूर्ण कोकण आणि राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानंतर ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस गायब झाला होता. आता ‘एल निनो’चा प्रभाव कमी झाल्याने २० जुलैनंतर मुंबईसह राज्यभरात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

 

बळीराजाला दिलासा, पाणी प्रश्न मिटणार
पाऊस उशिरा झाल्यानंतर पुन्हा गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत, तर उगवलेले बियाणे करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय राज्यातील अनेक धरणांमध्येही पाणीसाठा घटल्याने भरपावसात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले होते. मात्र हवामान खात्याच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार असून पाणी प्रश्न मिटण्याची आशा निर्माण झाली आहे.