ऋषभ पंतला वाचवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरला मिळाले हे बक्षीस

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर पंत स्वतः गाडीची विंड स्क्रीन तोडून बाहेर आला. यानंतर गाडीला भीषण आग लागली. यावेळी बस चालक सुशील आणि कंडक्टर परमजीत घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंतला वाचवले. या दोघांनाही सन्मानित करण्यात आले आहे.

शुक्रवारी पहाटे पंतच्या कारला रुरकीजवळ अपघात झाला. त्यानंतर बसचा चालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत आधी तेथे पोहोचले व त्यांनी पॅन्टला वाचवले आणि रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात पाठवले. या प्रशंसनीय कामासाठी या दोघांनाही बक्षीस मिळाले आहे. सुशील कुमार आणि परमजीत यांचा पानिपत डेपोच्या वतीने गौरव केला आहे. उत्तराखंड सरकारनेही या दोघांचा सन्मान करणार असल्याचे जाहीर केले आहे. या दोघांनी माणुसकीचे काम केल्याने त्यांचा सन्मान झालाच पाहिजे असे सरकारने म्हटले आहे.

पानिपत डेपोचे महाव्यवस्थापक कुलदीप झांगरा यांनी या दोघांचाही गौरव केला आहे. ते म्हणाले, ‘सुशील आणि परमजीत यांनी जखमी व्यक्तीला वाचवून चांगले काम केले आहे. तो जखमी व्यक्ती क्रिकेटपटू ऋषभ पंत असल्याचे त्यांना नंतर समजले. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. उत्तराखंड सरकारनेही या दोघांचाही सन्मान करणार असल्याचे जाहीर केले आहे.

यावेळी बस कंडक्टर परमजीत म्हणाला की, ‘आम्ही ऋषभ पंतला बाहेर काढताच, 5-7 सेकंदानंतर कारला आग लागली आणि ती जळून खाक झाली. त्यावेळी त्याच्या पाठीवर खूप जखमा होत्या. यानंतर, आम्ही त्याला विचारले की तो कोण आहे, तेव्हा त्याने सांगितले की तो क्रिकेटपटू ऋषभ पंत आहे. 5-7 सेकंद उशीर झाला असता तर काहीतरी अनुचित प्रकार घडला असता.