बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात धनशक्तीचा वापर, Video शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यापुढे अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे आव्हान आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीत पवार कुटुंबच आमनेसामने आले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार अशी शक्यता आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात धनशक्तीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

रोहित पवार यांनी गुरुवारी सकाळी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये काही महिला आपल्याला पैसे देऊन सभेला आणल्याचा आरोप करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ज्या व्यक्तीने या महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणले त्याला काही लोकं जाब विचारताना दिसत आहेत. या व्हिडीओसोबत रोहित पवार यांनी एक कॅप्शनही दिले आहे.

कुछ तो गडबड है… मतदानानंतर 10 दिवसांनी डेटा केला जारी, कारभारावर विरोधकांचे प्रश्नचिन्ह

बारामतीत सुप्रियाताईंच्या जनशक्तीविरोधात धनशक्तीचा कसा वापर होतो, याचा ट्रेलर बघायचा असेल तर हे व्हिडिओ बघा… मलिदा गँगने बंद पडलेल्या घड्याळाला कितीही चावी दिली तरी आता वेळ बदललीय आणि वारं फिरलंय.. त्यामुळं बारामतीत तर वाजणार स्वाभिमानाचीच तुतारी; असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.