देशातील हिंदू संकटात असतील तर राजीनामा द्या, संजय राऊत यांचे टीकास्त्र

काँग्रेसचे सरकार असताना भाजप त्यांच्यावर टीका करताना म्हणायची की हिंदू खतरे मे हैं! आता तुमचे हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे, तरीही जर देशात हिंदू खतरे मे हैं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही राजीनामा द्या अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकर) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही टीका केली आहे.

काँग्रेस नेते कमलनाथ यांनी हिंदुस्थानात 80 टक्के हिंदू असून हा देश आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे असे म्हटले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी म्हटले की, देशात 80 टक्के हिंदू आहेत. तरीही हिंदू मुसलमान दंगे इथे भडकावत आहात. कधी लव्ह जिहादच्या नावावर तर कधी मंदिर-मशिदीवरून दंगे भडकावले जात आहेत. 10 वर्ष तुमचे हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे, तरीही जर देशात हिंदू खतरे मे हैं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही राजीनामा द्या.

चले जाव चळवळीचा आज वर्धापनदिन असून यानिमित्ताने अभिवादन करण्यासाठी निघालेल्या महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधींना पोलिसांनी रोखले होते. याबाबत बोलताना राऊत यांनी म्हटले की, “भारत छोडो किंवा चले जाव च्या चळवळीला संघ परिवाराचा विरोध होता. श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी ब्रिटीश सरकारला त्या काळी काय पत्रे लिहिली हे रेकॉर्डवर आहे. चले जावचे आंदोलन चिरडून टाकले पाहिजे, भारत छोडोला आमचा विरोध आहे, ब्रिटीश सरकारने या आंदोलनाला महत्त्व देऊ नये अशी भूमिका त्या काळी घेतली होती. जे स्वातंत्र्य आंदोलनात कुठेच नव्हते ते आज ऑगस्ट क्रांती दिनी पुष्पचक्र वाहतात हा महाराष्ट्रातील आणि देशातील सगळ्यात मोठा विनोद आहे आणि तुषार गांधींना रोखलं हा त्यापेक्षा मोठा विनोद आहे.”

मणिपूरसंदर्भात काही गोष्ट आणि काही तथ्ये सरकार लवपण्याचा प्रयत्न करत आहे. तसे नसते तर आतापर्यंत मणिपूर सरकार बरखास्त झाले असते. मणिपूरचे मुख्यमंत्री हटवले गेले असते, मात्र इतके होऊनही तिथले मुख्यमंत्री पदावर कायम आणि सरकारही शाबूत आहे. संपूर्ण जगाने याबाबत आपली भूमिका निश्चित केले आहे, असे राऊत यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले.