माकड, मासा का सरपटणारा प्राणी? विचित्र सांगाड्याचे गूढ वाढले

लहान असताना घरातील मोठ्या माणसांकडून अकल्पनीय मात्र रंजक गोष्टी अनेकदा ऐकल्या असतील. यातील पात्रे आपल्याला लहानपणी अशक्य आणि अतर्क्य वाटायची मात्र त्यातली काही पात्रे आपल्यासमोर अचानक आली तर धक्का बसणे स्वाभाविक आहे. लहानपणी ऐकलेल्या जलपरीच्या कथा किंवा चित्रपटांमध्ये दिसणारे ममी याबाबत अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. अथक संशोधनांमुळे यातल्या काही गोष्टी खऱ्या झाल्या तर काही गोष्टी गूढ बननू राहिल्या. जगभरातील अनेक संशोधक कल्पनेपलिकडील गोष्टींवर संशोधन करत असून या संशोधकांना एका विचित्र जीवाचा बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला सांगाडा सापडला आहे.

डेली मेल नावाच्या इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार वैज्ञानिकांची एक टीम एका विचित्र प्राण्याच्या सांगाड्याचे संशोधन करत आहे. या प्राण्याचा काही भाग हा जलपरी सारखा आहे. काही भाग मगर किंवा पालीसारख्या सरपटणाऱ्या प्राण्याचा आहे तर काही भाग हा माकडासारखा आहे. हा प्राणी एका अमेरिकेन खलाश्याने जापानवरुन आणला होता असं म्हणतात. या प्राण्याला 1960 साली स्प्रिंगफील्ड, ओहायो येथील क्लार्क काउंटी हिस्टोरिकल सोसायटीला दान करण्यात आले होते. या प्राण्याचे दात, मोठ-मोठे पंजे, कमरेखाली माशासारखा भाग आणि राखाडी केस आहेत. हा प्राणी नेमका आहे तरी काय याचं अनेकांना कोडं पडलेलं असून याचं उत्तर शोधण्यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत. शास्त्रज्ञांनी या प्राण्याची अधिक माहिती मिळावी यासाठी एक्स-रे आणि सिटी स्कॅन केला आहे. नॉर्दर्न केंटकी विद्यापीठातील रेडिओलॉजिस्ट जोसेफ क्रेस म्हणाले, ‘या प्राण्याचे बाह्य स्वरुप पाहता हा प्राणी तीन वेगवेगळ्या प्रजातींचे मिश्रण वाटतो. त्याचे डोके आणि शरिराचा काही भाग माकडासारखा आहे, त्याचे हात मगर किंवा सपटणाऱ्या प्राण्यासारखे आहे आणि त्याची शेपटी माशासारखी आहे.