उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्यात ‘मातोश्री’वर बैठक; दोन तास चर्चा, भाजपच्या पराभवासाठी व्यूहरचना… आखणी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज मातोश्री निवासस्थानी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर विस्ताराने खल झाला.

मोदी सरकार आणि भाजपची हुकूमशाही उखडून टाकण्यासाठी इंडिया आघाडीची भक्कम एकजूट उभी राहिली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

शरद पवार सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास मातोश्री निवासस्थानी पोहोचले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास दोन तास विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते.

– जागावाटप पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून विविध आघाडय़ांवर निवडणुकीसाठी व्यूहरचना आखली जात असून त्याचाच भाग म्हणून मातोश्री निवासस्थानी बैठक घेण्यात आली.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपविरोधाप काय रणनीती असावी, यावर बैठकीत खल झाल्याचे कळते. राज्यात लोकसभेसाठी लवकरच संयुक्त प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. त्यावरही बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.