सेक्स्टॉर्शन, डिपफेकद्वारे होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला आळा घाला – आमदार विलास पोतनीस

सेक्स्टॉर्शन, डिपफेकद्वारे ब्लॅकमेलिंगच्या घटना समाजात वाढल्या असून त्यांना आळा घाला, अशी मागणी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी आज विधान परिषदेत केली. नाशिकच्या दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पिठाच्या विश्वस्तांना अशाच प्रकारे ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून एका कृषी सहाय्यक महिलेने खंडणी मागितली. त्यासंदर्भात आमदार पोतनीस यांनी आज लक्षवेधी सूचना मांडली होती.

संबंधित महिलेला अटक होऊन तिला सरकारने सेवेतून निलंबितही केले. परंतु जो व्हिडीवो दाखवून तिने खंडणी मागितली त्याची सत्यता सरकारने पडताळली आहे का, संबंधित महिलेकडून अजून किती जणांचे सेक्स्टॉर्शन केले आहे त्याची चौकशी केली गेली आहे का, असे प्रश्न आमदार पोतनीस यांनी उपस्थित केले. सदरहू महिलेने संकल्प सिद्धी नावाची संस्था काढून त्या संस्थेतील सेवेकऱ्यांकडूनही पैसे जमा करून त्यांची फसवणूक केली याकडेही आमदार पोतनीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

डिपफेकविरुद्ध कडक कायदा बनवणार – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लक्षवेधीला उत्तर देताना डिपफेकविरुद्ध पेंद्र सरकारने कडक कायदा बनवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. डिपफेकचा वापर करून व्हिडीओत कुणाचाही चेहरा आणि आवाज टाकला जाऊ शकतो. त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले.