भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेऊन नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराशी कसे लढणार? संजय राऊत यांचा परखड सवाल

भाजपचे जळगावचे विद्यामान खासदार त्यांच्या समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जळगाव मतदारसंघात अधिक मजबूत होणार असून पक्षाची ताकद वाढणार आहे, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच भाजपकडून करण्यात येणाऱ्या नारेबाजीही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष त्यांच्या समर्थक आणि अनेक पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी दुपारी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ही भाजपची पडझड नसून भाजपचा वृक्ष मूळापासून उखडणार आहे. त्यांची पक्षाची मुळे ईडी आणि सीबीआयची आहेत. स्वतःला महावृक्ष समजणारा हा पक्ष मुळापासून कोसळणार आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक रंगतदार होणार असून ही शिवसेनेला विजयाकडे गेऊन जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचा खासदार जळगावमधून निवडून जाईल, याबाबत आमच्या मनात शंका नाही. भाजपवाले फक्त नारेबाजी करत आहेत. अब की बार 400 पार, ही नारेबाजीही तशीच आहे. काही दिवसानंतर भाजप नारेबाजीही राहणार नाही. अखंड हिंदुस्थान करू, पाकव्याप्त कश्मीर भारतात आणू, चीनला धडा शिकवू, अशी नारेबाजी नरेंद्र मोदीही करत होते. त्याचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला. त्यांचे नाऱ्यांचे पुस्तक काढायला हवे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. गर्जना आणि नारेबाजी यात खूप फरक आहे. आमच्या गर्जना आणि वाघाच्या डरकाळ्या आहेत. त्यामुळे त्यांना करायची तेवढी नारेबाजी करू द्या, असेही ते म्हणाले.

आपल्याला भ्रष्टाचाराशी लढायचे आहे आणि इंडिया आघाडी भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. मात्र, सध्या परिस्थिती याच्याविरुद्ध दिसत आहे. भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेत आपण त्यांचा बचाव करत आहोत आणि इंडिया आघाडी भ्रष्टाचाराशी लढत आहे, असे मोदींनी म्हणायला हवे. देशातील सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेत मोदी भ्रष्टाचाराशी कसे लढणार आहेत, असा सवालही त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने आपच्या संजय सिंह यांना जामीन मंजूर केला. तसेच ईडी आणि मोदी सरकारची पोलखोल केली आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे, विरोधकांचा आवाज दडपण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. आता जनतेलाही त्याचे खरे रुप कळले आहे. गेल्या 10 वर्षांपासून देश भ्रष्टाचाराच्या आगीत होरपळत आहे.

मणिपूर, अरुणाचल प्रदेश, जम्मू कश्मीरमधील कश्मीर पंडित, चीनची घुसखोरी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलत नाही. देशाच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान बोलत नाही, हे गंभीर आहे. ते फक्त विरोधकांवर आरोप करत आहेत. भाजपचा चेहरा जनता 10 वर्षापासून बघत आहे. आता जनतेला हा चेहरा बघायचा नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर त्यांना सत्तेतून जावेच लागेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.