महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा अपमान सहन करणार नाही! प्रेरणा गीतातील ‘जय भवानी’ शब्द हटवणार नाही; उद्धव ठाकरे यांचा निर्धार

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचारासाठी एक प्रेरणागीत नुकतेच प्रसारीत केले आहे. त्या गीतातील दोन शब्द हटवण्यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. त्यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावले आहे. आम्ही धर्माच्या आधारावर मते मागितली नाहीत. हिंदू या शब्दाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. तसेच जय भवानी, जय शिवाजी हा महाराष्ट्राचा जयघोष आहे. त्यामुळे या प्रेरणा गीतातील हे शब्द कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येणार नाही. आमच्या वर कारवाई करायची असेल तर आधी धर्माच्या नावाने प्रचार करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर कारवाई करा, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे. मुंबईतील मतोश्री या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मते मांडली.

महाराष्ट्रात निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. यापुढील टप्प्यांचा प्रचार आता वेग घेत आहे. आता आपण बुलढाण्याला जात असून विदर्भ, मराठवाडा असा आपला प्रचाराचा दौरा असणार आहे. प्रचारात मूळ मुद्दे बाजूला पडतात की काय अशी शंका येते. गेल्या 10 वर्षात सत्तेवर असताना मोदी सरकारने काय केले, या महत्त्वाच्या प्रश्नाला बगल दिली जात आहे. हा मुद्दा बाजूला करत इतर मुद्द्यांना महत्त्व देत जनतेची दिशाभूल केली जात आहे, असे ते म्हणाले.

नुकत्याच पाच राज्यात विधानसभांच्या निवडणुका झाल्या. त्याच्या प्रचारावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपला मत दिल्यास अयोध्येत राम मंदिराचे दर्शन मोफत घडवण्यात येईल, असे वक्तव्य करत आहे. याबाबतचा व्हिडीओ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवला. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता. तसेच सहा वर्षे त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. त्या पार्शवभूमीवर आम्ही निवडणूक आयोगाला विचारणा केली होती की, आयोगाने निवडणूक नियमात काही बदल केला आहे काय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा खुलेआम धार्मिक प्रचार करत आहेत. जय बजरंगबली के बोल के बटन दबाना, असे ते सांगत आहेत. याबाबत आम्ही विचारणा केली होती. तसेच स्मरणपत्र दिल्यानंतरही निवडणूक आयोगाकडून काहीही उत्तर आले नाही.

याबाबत उत्तर दिले नाही तर नियम बदलला आहे, असे समजून आम्ही प्रचार केला तर कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा असा प्रचार केल्याबाबत त्यांच्यावर काय कारवाई केली, ते स्पष्ट करा, असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले होते. मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर आले नाही. आता आमची निशाणी बदलली असून मशाल ही आमची निशाणी आहे. प्रचार म्हटला की प्रेणागीत लागते. आता आम्ही मशालगीत आणले आहे. हे गीत निवडणूक आयोगाकडे गेल्यावर त्या प्रेरणागीतातील हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे तू मर्म या ओळीतील हिंदू हा शब्द त्यांनी काढायला सांगितला आहे. आताचे जे राज्यकर्ते आहेत, त्यांच्या आदेशाखाली निवडणूक आयोग काम करत आहे, आता त्यांनीच सांगावे की हिंदू हा शब्द काढणे योग्य आहे काय, असा सवालही त्यांनी केला.

आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितलेले नाही. राज्यकर्त्यांचे चाकर असलेल्या निवडणूक आयोगाने ही बाब लक्षात घ्यायला हवी. आपण दाखवलेल्या व्हिडीओत पंतप्रधान म्हणत आहे की, बजरंगबली का जय बोलके बटन दबाना, अमित शहा म्हणत आहे की, आम्हाला मत द्या, आम्ही रामललाचे दर्शन मोफत घडवू. आम्हीही रामाचे आणि हनुमानाचे भक्त आहोत. आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशिर्वाद दिले. तिने दिलेल्या भवानी तलवारीचा प्रसंग सगळ्यांच्या हृदयात कोरला गेला आहे. गेली अनेक वर्ष जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष जनता करत आहे. त्यामुळे हे शब्द जनतेच्या हृदयात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोग आमच्या विचारणेला उत्तर देत नसेल तर आम्ही हर हर महादेव किंवा जय भवानी, जय शिवाजी असे आम्ही म्हटले तर त्याला आक्षेप असता कामा नये. हा जयघोष आम्ही म्हणणारच, त्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. या प्रेरणागीतात बॅकग्रांउडला जय भवानी,जय शिवाजी हा जयघोष कोरसमध्ये आहे. तो काढण्याची नोटीस निवडणूक आयोगाने दिली आहे. आम्ही हा शब्द काढणार नाही. तसेच निवडणूक आयोग आमच्यावर कारवाई करणार असेल तर त्यांनी आधी मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करावी, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

हे शब्द काढण्याचे आदेश म्हणजे महाराष्ट्राच्या कुलदैवतेचे अपमान त्यांनी केला, यावर त्यांच्याकडे काही उत्तर आहे काय? महाराष्ट्राबाबतचा आकस राज्यकर्त्यांच्या कृतीतून दिसत आहे. मात्र, महाराष्ट्राच्या कुलदैवतेविषयी एवढा द्वेष त्यांच्या नसानसात असेल, याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही याबाबत लढाई लढत आहोत आणि लढणार आहोत. तसेच कोणत्याही परिस्थितीत आमच्या गीतातून जय भवानी हा शब्द काढला जाणार नाही. निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करायचे ठरवल्यास त्यांना आधी मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करावीच लागेल. आमच्या कुलदैवतेचा अपमान कसा करता, ते आम्ही बघतो, असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही याबाबत कोणताही अन्याय सहन करणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.