नगरमध्ये बंद सिग्नलला घातला चपलाचा हार; शिवसेनेचे अनोखे आंदोलन

नगर शहरातील बंद सिग्नल सुरू करावेत, या मागणीसाठी शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलन केले. चांदणी चौकातील बंद सिग्नलला चपलांचा हार घालून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 15 दिवसांत सिग्नल सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी दिला.

दोन-तीन वर्षापासून शहरातील बहुतांश सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहतुकीचा पुर्णपणे बोजवारा उडाला आहे. या कालावधीत अनेकांचे बळी गेले. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. छोट-मोठे अपघात हे तर नित्याचे झाले आहेत. उड्डाणपूल होऊन वर्ष उलटले तरीही उड्डाणपुलाखालील सिग्नलही अद्याप सुरु झालेले नाहीत. याबाबत आपण वेळोवेळी प्रशासनास निवेदन देऊन सिग्नल सुरु करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बंद सिग्नलचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन आणखी किती बळी घेणार, असा सवाल करत पुढील 15 दिवसांत सिग्नल सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फुलसौंदर यांनी दिला.

बंद सिग्नल व उड्डाणपुलाखालील सिग्नल तातडीने सुरु करण्यात यावे, या मागणीसाठी शहर शिवसेनेच्या वतीने माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या नेतृत्वाखाली चांदणी चौक येथील सिग्नलला चपलांचा हार घालून निषेध करण्यात आला. संभाजी कदम म्हणाले की, सिग्नलअभावी शहरातील वाढते अपघात ही चिंतेची बाब असून वाहतूक कोंडी, अवजड वाहतूक यामुळे शहरातील नागरिकांना रस्त्यावरुन चालणे कठीण झाले आहे. चौका-चौकात वाहतुकीचा बोजावारा उडत असून प्रशासनाचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील बंद असलेले सिग्नल सुरु करावेत, यासाठी प्रशासनास वेळोवेळी सांगण्यात आले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.