श्रीलंकन महिला संघाचा आफ्रिकेत डंका; 302 धावांचा विश्वविक्रमी पाठलाग

श्रीलंकन महिला क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेत विजयाचा डंका वाजवताना विश्वविक्रमी विजयाची नोंद केली. महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात विक्रमी 302 धावांचा यशस्वी पाठलाग करत नवा विक्रम रचला. कर्णधार आणि सलामीवीर चमारी अटापट्टू हिने 195 धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विश्वविक्रमी विजयावर शिक्कामोर्तब केले. पण तिचे विक्रमी द्विशतक अवघ्या पाच धावांनी हुकले. या विजयासह श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

दक्षिण आफ्रिकेने कर्णधार लॉरा वॉलवडर्टच्या 147 चेंडूंतील 184 धावांच्या खेळीच्या जोरावर 50 षटकांत 5 बाद 301 धावा केल्या होत्या. या विक्रमी धावसंख्येचा श्रीलंकेला कर्णधार चमारी अटापट्टूने विश्मी गुणरत्नेच्या साथीने 90 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर प्रसादनी विराक्कोडी (4), हंसिमा करुणारत्ने (3) आणि कविशा दिलहारी (0) यांचे धडाधड विकेट घेत आफ्रिकन गोलंदाजांनी लंकन संघाची 4 बाद 126 अशी दारुण अवस्था केली. या हादर्यानंतर श्रीलंकन संघ कोसळेल, असा अंदाज होता. पण कर्णधार अटापट्टू हिने संस्मरणीय आणि झुंजार खेळ करत श्रीलंकेला विजयपथावर आणण्याचा करिश्मा करून दाखवला. तिने निलाक्षिका सिल्वाच्या साथीने दमदार खेळ करत आफ्रिकन गोलंदाजांना दमवले. त्यातच चमारीने शतक, मग दीडशतकी टप्पा पार करत संघाला विजयासमीप नेले. दोघींच्या भन्नाट खेळामुळे 40 षटकांनंतरच लंकेचा विजय निश्चित झाला होता. अखेर 45 व्या षटकांत क्लार्कला षटकार खेचत श्रीलंकेच्या विश्वविक्रमी पाठलागावर विजयाची मोहोर उमटवली. तिने आपल्या 195 धावांच्या नाबाद खेळीत 26 चौकार आणि 5 षटकार खेचले. अटापट्टूचे द्विशतक व्हावे म्हणून सिल्वा हिने जास्तीत जास्त स्ट्राइक तिलाच दिली, पण अटापट्टूला पाच धावा कमीच पडल्या. दोघींनी पाचव्या विकेटसाठी 179 धावांची अभेद्य आणि विक्रमी भागी रचली. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने जवळपास दहा वर्षांपूर्वी 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 289 धावांचे लक्ष्य गाठले होते, मात्र आता श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मागे टाकला आहे.

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकन डावातही कर्णधार लॉरा वॉलवडर्टचे झंझावाती शतक पाहायला मिळाले. सलामीला उतरलेली लॉरा शेवटपर्यंत नाबाद राहिली आणि तिने 147 चेंडूंत 23 चौकार आणि 4 षटकार खेचत विक्रमी 184 धावांची खेळी केली. ती दक्षिण आफ्रिकेची सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारी फलंदाज ठरली. तिने आपल्या सलामीच्या साथीदार लारा गुडालसह 116 धावांची भागी रचली तर कॅपसह 63 आणि नदाईन क्लार्कबरोबर 92 धावांची भागी रचत संघाला त्रिशतकी धावांसमीप नेले.

एकाच दिकशी दोन कर्णधारांची विक्रमी शतके

आज एकाच सामन्यात दोन्ही कर्णधारांनी आपापल्या देशांसाठी सर्वोच्च खेळी करण्याचा विक्रम रचला. दोघींनाही द्विशतकाची संधी होती, पण त्या थोडे कमी पडल्या. महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आजवर केवळ दोनच द्विशतकी खेळ्या ठोकल्या गेल्या आहेत. 1997 साली ऑस्ट्रेलियन बेलिंडा क्लार्कने मुंबईत एमआयजीच्या मैदानावर डेन्मार्कविरुद्ध 229 धावांची अभेद्य खेळी केली होती तर 2018 साली न्यूझीलंडच्या अमेलिया केरने तो विश्वविक्रम मोडीत काढताना डबलीन येथे आयर्लंडविरुद्ध 232 धावांची नाबाद खेळी केली होती.