पावसाच्या ओढीने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव,कोल्हापूर जिह्यात उसाच्या लागणीमध्ये मोठी घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले. तळ गाठलेली धरणे 90 ते शंभर टक्के भरली असली तरी पावसाअभावी पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होत असून, पिकांवर विविध किडींच्या प्रादुर्भावास सुरुवात होताना दिसत आहे. कोल्हापूर जिह्यात यंदा उसाच्या लागवडीत 10 हजार हेक्टरपेक्षा जास्त घट झाली आहे.

कोल्हापूर जिह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1 हजार 971.6 मि.मी. असून, मेअखेर 37.3 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. जून महिन्यात 93.7 मि.मी. (25.8 टक्के), जुलैअखेर 601.3 मि.मी. (87.7 टक्के). ऑगस्ट महिन्यात 132.1 मि.मी. (27.2 टक्के) पावसाची नोंद झालेली आहे. शिरोळ तालुक्यात सलग 28 दिवस पावसास खंड पडलेला आहे. हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा व अन्य तालुक्यांत 25 टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जिह्यात यंदाच्या खरीप हंगामातील 1 लाख 92 हजार 633 हेक्टर या सर्वसाधारण क्षेत्रातील भात, ज्वारी, भुईमूग, नाचणी, सोयाबीन या पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उशिरा पेरणी झालेल्या क्षेत्रात कोळपणी आणि भांगलणीची कामे सुरू झालेली आहेत. सर्व पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने, पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. पिकांवर करपा रोग, पाने खाणारी व उंट अळी, किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी मोठय़ा पावसाची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा पिकाच्या वाढीवर व उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 92 हजार 320 हेक्टर असून, चालू हंगामात 89 हजार 914 हेक्टर (95.55 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पिकाची परिस्थिती समाधानकारक असून, पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. भातावर करपा रोग, पाने गुंडाळणारी अळी व खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नाचणी पिकाचे क्षेत्र 17 हजार 100 हेक्टर असून, सध्या 16 हजार 718 हेक्टरवर (97.77 टक्के) पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीची 550 हेक्टर (58.70 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सोयाबीनची 40 हजार 052 हेक्टरवर (94.74 टक्के) पेरणी झालेली आहे. भुईमूग पिकाची लागवड 34 हजार 939 (98.94 टक्के) हेक्टरवर झालेली आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने हुमणी किडीचा मोठा फटका शेतीला बसत आहे.

तूर, मूग, उडीद व इतर कडधान्ये पिकांच्या लागवडीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. या पिकांवर उंट अळी दिसून येत आहे. दरम्यान, यंदा उसाच्या लागवडीत 10 हजार हेक्टरची घट झाली असून, एक लाख 86 हजार 215 हेक्टरवर लागण करण्यात आली आहे. उसावर हुमणीसह लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर दिसत आहे. काही तालुक्यातील पिकांवर ‘यलो व्हेन मोजक’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. उशिरा पेरणी झालेले पीक फुलोरा अवस्थेत आहे. या परिसरात पिकावर करपा, पाने खाणारी अळी, उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

शेतकरी दुहेरी अडचणीत

यंदा ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्यामुळे पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. मोठय़ा प्रमाणावर कर्ज काढून शेतकऱयांनी शेतीसाठी खर्च केला आहे. जर आता पाऊस नाही झाला, तर पिकासोबत केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या दुहेरी अडचणीत असलेला शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. जर आता पाऊस पडला नाही, तर दुबार पेरणी करायची कशी, हा मोठा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर आहे.