गिरगाव येथील स्वामी समर्थ मठाची 125 वर्षे

गिरगावात कांदेवाडी येथे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे मठ आहे. मुंबईतील हा पहिला स्वामी मठ असल्याचे सांगितले जाते. या मठाला यंदा 8 ऑक्टोबर 2023 रोजी 125 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

गिरगाव येथे स्वामी समर्थ मठाची स्थापना 8 ऑक्टोबर 1898 रोजी झाली. त्या वेळी स्वामीभक्त दिवंगत गणेश बल्लाळ मुळेकर यांनी स्वामींची तसबीर, पादुका आणि दत्त मूर्तीची स्थापना केली. पुढे गणेश बल्लाळ मुळेकर यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव दिवंगत दत्तात्रय मुळेकर यांनी 9 मे 1907 रोजी विश्वस्त मंडळ नेमून न्यासाची स्थापना केली. कालांतराने मठाच्या वास्तूची पुनर्बांधणी स्वामीभक्तांच्या आर्थिक सहकार्याने करण्यात आली.

मठात नियमितपणे काकड आरती, सकाळ आणि संध्याकाळी आरती, तसेच शेजारती होते. पहाटे 5.15 वाजता मठ खुला होतो. नैवेद्य दुपारी 12.30 वाजता दाखवला जातो. त्यानंतर मठ दुपारी 4 वाजेपर्यंत दर्शनाकरिता बंद असतो.  रात्री 10.30 वाजता मठ बंद होतो.  मठात दत्तसांप्रदायिक सर्व उत्सव केले जातात. स्वामी पुण्यतिथीनिमित्त अखंड नामस्मरण सप्ताह, अखंड गुरुचरित्र पारायण केले जाते. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा असतो.  सध्या मठाचे अध्यक्ष सच्चिदानंद दादरकर व प्रशांत मुळेकर, उमेश मदन, सिताराम वाडेकर, ओमकार मुळेकर हे विश्वस्त आहेत, तर कार्यालयीन व्यवस्थापक प्रकाश बोरकर आणि सहाय्यक रुची बिरमोळे आहेत.

शतकोत्तर रौप्यमहोत्सव

शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी मुंबई मराङ्गी साहित्य संघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी मठाशी संबंधित 25 ज्येष्ठ सेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय इतरही कार्यक्रम होणार आहेत.

गरजूंना वैद्यकीय व शैक्षणिक मदत

मठातर्फे गिरगावातील शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. कोविड काळात मठातर्फे केईएम रुग्णालयाला 25 लाखांची मदत केल्याची माहिती न्यासातर्फे देण्यात आली.