संघर्षगाथा : देव तारी त्याला कोण मारी 

>>स्वप्निल साळसकर

38 वर्षे मर्चंट नेव्हीमध्ये काम करताना अनेक बऱयावाईट  अनुभवांना सामोरे जावे लागताना अगदी अनपेक्षित आणि जीवावर बेतलेल्या प्रसंगाचे प्रकाश घाडी यांचे अनुभव कथन.

21 जानेवारी 1991 ची गोष्ट. रात्रीचे 12.30 वाजले होते. जेवण झाल्यानंतर विश्रांतीसाठी अंथरुणावर पडणार एवढय़ात एक मोठा झटका बसला. बाहेर येऊन पाहतो तर जहाजाचा पुढचा भाग पाण्याला टेकलेला. त्यातून पाणी आत वेगाने शिरत होते आणि क्षणार्धात दोन तुकडे होत ‘कॉन्टिनेंटल लोटस’ भोवऱयाच्या फिरकीप्रमाणे बुडाले. ते ठिकाण होते इजिप्त देशातील सुवेझ कालवा पार केल्यानंतरचे. या दुर्घटनेतून सुदैवाने बचावलो…’  प्रकाश घाडी सांगतात. या दुर्घटनेत 42 पैकी 38 जणांचा मृत्यू झाला, तर चौघे सहीसलामत बाहेर पडले. त्यापैकी एक म्हणजे सिंधुदुर्गात देवगड तालुक्यातील पडेल गावचे सुपुत्र प्रकाश घाडी.

मर्चंट नेव्हीमध्ये गेली 38 वर्षे जगभरातील देशांची सफर करताना महिनोन्महिने पाण्यात राहून आठवणाऱया त्या दिवसांचे किस्से घाडी यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हय़ात देवगड तालुक्यातील पडेल हे प्रकाश घाडी यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म मुंबईत झाला. चौथीपर्यंत मुंबईत राहिल्यानंतर पुढे पाचवीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण गावाकडे झाले. वडील मुंबईत नोकरी करून एकटे कमावणारे आणि घरात खाणारी दहा तोंडे, त्यात वयाने सर्वात मोठे असल्याने प्रकाश यांच्यावर घरची पुढची जबाबदारी आली. गोडी असूनही खर्चाअभावी पुढचे शिक्षणही घेता आले नाही. अनेक कंपन्यांमध्ये नोकरी करीत अनुभवाची शिदोरी गाठीशी बाळगत असतानाच एका दैनिकात मर्चंट नेव्हीमध्ये सीमेनविषयी जाहिरात वाचली आणि बेलार्ड पिअरमध्ये जाऊन फॉर्म भरला. निवड झाल्यानंतर सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी विशाखापट्टणमला पाठवण्यात आले. प्रशिक्षणही पूर्ण झाले. चांगली नोकरी मिळाली.

1978 साली प्रकाश घाडी विमानाने जर्मनीला पोहोचले आणि तेथे हंबक पोर्टवर जहाजावर रूजू झाले. 11 महिने 12 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ते गावी परतले. वर्षभर काम केल्यानंतर मर्चंट नेव्हीत चार ते पाच महिन्यांची सुट्टी असे. त्यावेळी कंपनीला गरज भासली तर पुन्हा बोलावून घेण्यात येई आणि नेमके तसेच घडले. काही दिवसांतच घाडी यांना पूर्वी काम केलेल्या काण्टिनेंटल लोटस जहाजावरील चीफ ऑफिसर दुबे यांनी बोलावून घेतले. पण घाडी पुन्हा त्याच जहाजावर जाण्यास इच्छुक नव्हते. कारण ते जहाज खूप जुने होते. अखेर पाच महिन्यांनंतर घरातून ते बाहेर पडले. वाटेत एकजण भेटला. तो घाडी यांना म्हणाला, तुला मारणाऱयापेक्षा तारणारा मोठा आहे. त्यांनी त्या वाक्याकडे दुर्लक्ष केले. मात्र ते शब्द कानात घुमत होते.

न्हावा-शेवाला उभे असलेल्या जहाजातला माल काढल्यानंतर ‘कॉण्टिनेंटल लोटस’ सर्व्हेसाठी गोव्याला पाठवण्यात आले. 15 दिवस त्या जहाजाची लहान-मोठी दुरुस्तीची कामे करून गोव्यावरून ते जहाज आयर्नोल (लोखंडाचा कीस) भरून इटलीकडे जाण्यासाठी निघाले. तेथील सिसली पोर्टवर त्यांना तो माल पोहोचवायचा होता. घाडी यांच्यावर सीमेन हेल्समन ही जबाबदारी होती. जहाजावरील इंजिन, डेक डिपार्टमेंट, किचन

कॅटरिंगमधील मेंटेनन्सचे काम घाडी पाहात होते. अनेक दिवसांचा प्रवासानंतर कॉण्टिनेंटल लोटस इजिप्तजवळ सुवेझ कालव्यापाशी पोहोचले. अशातच वातावरणात बदल होऊन एकदम वादळ उठले. सोसाटय़ाच्या वाऱयाने जहाजाला हलवून सोडले. चार दिवसाच्या भयंकर वादळामुळे तपासणीसाठी जहाजावर बाहेर पडता येईना. जहाजावर त्यावेळी 42 कर्मचारी होते.

चौथ्या दिवशी 20 जानेवारी 1991 रोजी वादळ शांत झाले होते. पण जहाज पुढील बाजूने झुकले होते व काही भाग तुटल्याने पाणी आत आले होते.  कर्मचाऱयांनी ते उपसले. लोड केलेला माल दुसऱया राखीव जागेत हलवण्यात आला. मात्र पाणी आत यायचे थांबत नव्हते. रात्रीचे 11 वाजले होते. त्यावेळी बोटीला एकदम जोराचा झटका बसला. ते पाहण्यासाठी घाडींसहित त्यांचे सहकारी मधील मोकळय़ा जागेत जमा झाले. पुढील भाग पाण्याला टेकलेला होता. काही करायचे सुचत नव्हते… आणि इतक्यात डोळय़ांची पापणी लवते न् लवते तोच 12.30च्या सुमारास बोटीचे दोन तुकडे झाले व पाण्याने बोटीला कवेत घेतले. लाइफ जॅकेटमुळे काही वेळाने पाण्याने सर्वांना वर फेकले. जहाजाची इंधन टाकी फुटल्यामुळे ऑइल पूर्ण शरीराला लागले होते. पाण्यावर उलटय़ा पडलेल्या फायबर बोटीचा आधार घेत लाल कपडय़ाने सिग्नल दाखवण्याचा प्रयत्न या दुर्घटनेत वाचलेले आसिफ म्हसकर आणि प्रकाश घाडी दोघेही करीत होते. प्रकाश घाडी यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. या अपघातात 38 जणांनी आपले प्राण गमावले.

रात्रीच्या वेळी महासागरात घडलेली घटना सांगताना घाडी यांच्या अंगावर शहारे येत होते. 38 मृतदेह मिळाले असले तरी त्यांना ओळखणे खूप कठीण काम होते. कारण त्यांचे शरीर मोठमोठय़ा माशांनी खाल्लेले होते. हातवारे करीत मदत मागणाऱया घाडी आणि म्हसकर यांनी तयार केलेल्या कपडय़ाचा लाल सिग्नल पाहून नॉर्वे देशाची कारम्यॉन बोट मदतीला धावली. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना होती. प्रकाश घाडी घरून निघाले असताना त्यांना  रस्त्यात भेटलेल्या व्यक्तीचे शब्द आजही आठवतात.

38 वर्षांच्या या पाण्यातील प्रवासातील सुखद अनुभव त्यांनी कथन केले. गळाच्या सहाय्याने भरभरून पकडलेली ताजी मासळी आणि जेवणावर मारलेला ताव आजही आठवतो. आपल्या या प्रवासात समुद्रात अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेऊन आपणही माणुसकीच्या नात्याने इतर देशांतील अपघातग्रस्त बोटींमधील खलाशी, प्रवाशांना सुखरूप बंदरावर पोहोचवण्याचे काम केल्याचे घाडी आवर्जून सांगतात.

[email protected]