गुरसाळे बंधाऱ्यावर कारवाईसाठी आलेल्या सरकारी पथकाला रोखले

भीमा नदीकाठच्या शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच शेतीसाठी पाणीउपसा करीत असलेले विद्युत पंप जप्त करण्यासाठी आलेल्या पथकास कौठाळी, गुरसाळे येथील शेतकऱयांनी तीव्र विरोध करीत रोखले. त्यामुळे कारवाई न करताच या पथकास परत फिरावे लागले. दरम्यान, ऐन उन्हाळ्यात नदीकाठच्या शेती पंपांचा वीजपुरवठा केवळ दोन तास सुरू ठेवला असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेती पंपांचा वीजपुरवठा केवळ दोन तास सुरू ठेवण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत. मात्र, उन्हाचा कडाका वाढत असून, पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. यावर नदीकाठच्या शेतकऱयांनी सिंगल फ्युजवर जुगाड करून शेती पंप चालविण्याचा प्रयत्न केला आहे. हे जुगाड केलेले शेती पंप बंद करून जप्त करण्यासाठी प्रांताधिकाऱयांनी पाटबंधारे, कृषी, महसूल, महावितरणची पथके नियुक्त केली आहेत.

आज दुपारी महसूल, पाटबंधारे, वीज वितरण आणि कृषी विभागाचे सहाजणांचे पथक गुरसाळे बंधाऱयालगत आल्याची माहिती शेतकऱयांना मिळाली होती. त्यानंतर तातडीने कौठाळी, गुरसाळे, शिरढोण भागातील शेतकरी बंधाऱयावर जमा झाले आणि त्यांनी कारवाईसाठी आलेल्या पथकास तीक्र विरोध केला. ‘पाणी आमच्या हक्काचं… नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत बंधाऱयावर ठिय्या दिल्याने पथकास कारवाई न करताच परत फिरावे लागले.

यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सचिन अटकळे यांनी प्रांताधिकाऱयांना फोनवरून संपर्क साधला. चार तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी असताना दोन तास वीजपुरवठा केला जात आहे. तरीही अशा प्रकारची कारवाई करणे चुकीचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सुधाकर कवडे, गुरसाळेचे सरपंच दीपक शिंदे, महेश कोळेकर, अण्णा हजारे यांच्यासह मोठय़ा संख्येने आदींसह शेतकरी उपस्थित होते.