माझ्या जीवाला भाजपकडून धोका; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

भाजप मला आणि माझे पुतणे तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना टार्गेट करत असून, आम्हाला सुरक्षित वाटत नसल्याचा आरोप रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी एक ‘मोठा धमाका’ होईल, ज्यामुळे तृणमूल आणि त्यांचे उच्चपदस्थ जबरदस्त हादरतील, असे शनिवारी म्हटले होते. यानंतर लगेचच रविवारी ममता यांनी वरील आरोप केला.

भगव्या पक्षाच्या कारस्थानांना घाबरत नाही

भाजप मला आणि अभिषेकला टार्गेट करत आहे, आम्ही सुरक्षित नाही, पण आम्ही भगव्या पक्षाच्या कारस्थानांनाही घाबरत नाही. तृणमूलचे नेते आणि पश्चिम बंगालच्या लोकांविरुद्धच्या यांच्या कटापासून सर्वांनी सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पक्षाचे उमेदवार आणि राज्यमंत्री बिप्लब मित्रा यांच्यासाठी बालूरघाट लोकसभा मतदारसंघातील कुमारगंज येथे आयोजित एका प्रचार सभेत त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यात गडबड करण्यासाठी भाजप राज्याबाहेरील लोकांना आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चॉकलेट बॉम्बच्या धमकीला आम्ही भिक घालत नाही

अधिकारी यांच्यावरही त्या तुटून पडल्या. एक देशद्रोही आहे जो आपल्या कुटुंबाचे आणि बेकायदा कमावलेल्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी भाजपमध्ये सामील झाला आहे. मी त्याला सांगू इच्छितो, चॉकलेट बॉम्बचा स्फोट घडवून आणण्याच्या त्याच्या धमकीला आम्ही भिक घालत नाही. ममता यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या अधिकारी यांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपच्या भगवेकरणावर टीकास्त्र

दूरदर्शनसारख्या स्वतंत्र संस्थांचे नरेंद्र मोदी सरकारने भगवेकरण चालवले असल्याचा आरोप ममता यांनी केला. भगव्या रंगाचा असा वापर करून, संन्यासी आणि अध्यात्मिक नेत्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाचा भाजप अपमान करत असल्याचे त्या म्हणाल्या. भाजपचे धर्माधारित व्होट बँकेचे राजकारण आणि अजेंडा पुढे रेटण्यासाठीच ऐन निवडणूक काळातच दूरदर्शनचा लोगो भगव्या रंगात रंगवण्यात आला आहे. डीडीचा लोगो, जवानांची निवासस्थाने, वाराणसीतील पोलिसांचा गणवेश यांचे भगवेकरण याचीच झलक आहे, असे त्या म्हणाल्या.