निवृत्तीनंतर गावी स्थायिक होण्याचे स्वप्न अधुरेच! एएसआय टीकाराम मीना यांच्या मुलीची खंत

रेल्वेमध्ये 33 वर्षांची सेवा होत आल्याने पुढच्या सहा महिन्यांत आरपीएफच्या दादर पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एएसआय) टीकाराम मीना हे सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे राजस्थानच्या शामपुरा या मूळ गावी कुटुंबासह स्थायिक होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र आरपीएफचा जवान चेतनसिंह याने जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये केलेल्या गोळीबारात मीना ठार झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ते पाहत असलेले स्वप्न अधुरेच राहिले आहे. ते आता कधीच आमच्यासोबत असणार नाहीत, अशी खंत टीकाराम मीना यांची मुलगी पूजा मीना यांनी व्यक्त केली आहे. आपल्या वडिलांचा नाहक बळी गेल्याने त्यांना हुंदका आवरत नव्हता.

आपल्या वडिलांच्या मृत्यूची माहिती रेल्वे प्रशासनाने देताच पूजा मीना यांनी पतीसह कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात धाव घेतली होती. यावेळी त्यांचे पुरते अवसान गळाले होते. भरलेल्या डोळय़ांनी त्या उपस्थितांकडे पाहत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या वडिलांचे अखेरचे स्वप्न भंगल्याचे सांगितले. राजस्थानच्या सवाई माधवपूर जिह्यातील शामपुरा येथील मूळचे असलेले टीकाराम मीना हे 1990 मध्ये रेल्वेच्या सेवेत दाखल झाले होते. आरपीएफमध्ये विविध पदांवर काम केलेले मीना पश्चिम रेल्वेच्या दादर पोस्टमध्ये एएसआय म्हणून कार्यरत होते. ते लवकरच निवृत्त होणार होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीसह मुलाला राजस्थानात शामपुरा या मूळ गावी पाठवले होते. निवृत्त झाल्यानंतर स्वतःही शामपुराला जाण्याचे त्यांचे नियोजन होते. तसे त्यांनी घरच्यांनाही सांगितले होते. मात्र सहकारी म्हणून कार्यरत असलेल्या चेतन सिंहच्या गोळीबारात ते ठार झाल्याने गावी राहण्याचे त्यांचे स्वप्न पुरते भंगले असून होत्याचे नव्हते झाल्याचे पूजा मीना यांनी हुंदके देत सांगितले.

अखेर कुटुंब एकत्र आलेच नाही

जयपूर-मुंबई सेंट्रल या गाडीत झालेल्या फायरिंगमध्ये तीन प्रवाशांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये नालासोपारा येथील रहिवाशी असलेल्या अब्दुल कादीरभाई मोहम्मद हुसेन यांचाही समावेश आहे. त्यांचे नालासोपारा येथील आचोळा रोड येथे दुकान आहे. मोहरम असल्याने ते मध्य प्रदेशातील वानपूर या आपल्या मूळ गावी गेले होते, तर त्यांची पत्नी दुबईला मुलांकडे गेली आहे. त्यामुळे मोहरमनंतर सर्व कुटुंबाने एकत्र येण्याचे त्यांचे नियोजन होते. त्यासाठी अब्दुल हे मोहरमनंतर तत्काळ मुंबईच्या दिशेने येत होते. मात्र गोळीबारात ठार झाल्याने त्यांचे कुटुंब एकत्र आलेच नसल्याची माहिती रुग्णालयात आलेल्या त्यांच्या एका नातेवाईकाने दिली.