कोल्हापुरात महायुतीची भाडोत्री बाईक रॅलीही फेल

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीचे मिंधे गटाचे संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे. अर्ज भरण्यापासून झालेल्या प्रत्येक शक्तिप्रदर्शनात शाहू महाराज वरचढ ठरले आहेत. त्या तुलनेत आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मिंधे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहरात बाईक रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोसुद्धा गर्दीअभावी फेल झाल्याचे दिसून आले. गर्दीअभावी मुख्यमंत्री अर्ध्यातून रॅली सोडून निघून गेले, तर या रॅलीकडे उमेदवारासह भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे दिसले.

कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत कसबा बावडा येथील आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानासमोरील पॅव्हेलियन मैदानातून सकाळी दुचाकी रॅली काढण्यात येणार होती. दुपारी बारापर्यंत मैदानात मोजकेच कार्यकर्ते जमल्याने मुख्यमंत्र्यांसह उमेदवार मंडलिक आलेच नाहीत. अखेर कार्यकर्त्यांनीच स्वतः ही रॅली काढली. पॅव्हेलियनकडून येणारी बाईक रॅली दसरा चौक येथे राजेश क्षीरसागर गटाकडून काढण्यात येणाऱया रॅलीत सहभागी होणार होती. पण, अखेर त्या रॅलीविनाच दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. यामध्येही भाजपसह मित्रपक्षांचे कार्यकर्ते आणि स्वतः उमेदवार मंडलिक यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले, तर मुख्यमंत्र्यांनी मध्येच रॅलीची सांगता करत कोल्हापुरातून काढता पाय घेणे पसंत केले.