आज तिसरा अन् निर्णायक सामना; टीम इंडियाला सलग 13 वी मालिका जिंकण्याची संधी

हिंदुस्थान-वेस्ट इंडीजदरम्यान उद्या (दि. 1) तिसरा व निर्णायक एकदिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे. टीम इंडियाला विंडीजविरुद्ध सलग 13 वी एकदिवसीय मालिका जिंकून आपल्या विक्रमाला आणखी बळकटी देण्याची संधी असेल. दुसरीकडे दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 बरोबरी साधणाऱया यजमान विंडीजला सलग दुसऱया विजयासह तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थानविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागेल.

17 वर्षांपासून वन डेत विंडीजविरुद्ध अजेय

हिंदुस्थान-वेस्ट इंडीजदरम्यान पहिली एकदिवसीय क्रिकेट मालिका मार्च 1983 मध्ये झाली होती. त्यावेळी विंडीजने ही मालिका 2-1 फरकाने जिंकली होती. त्यानंतर 1989 पर्यंत कॅरेबियन संघाने सलग पाच एकदिवसीय मालिकेत विंडीजला हरविले. मग 1994 मध्ये हिंदुस्थानने पहिल्यांदा वेस्ट इंडीजला एकदिवसीय मालिकेत हरविले. घरच्या मैदानावर हिंदुस्थानने 4-1 फरकाने बाजी मारली होती. त्यानंतर जय-पराजयाचा खेळ सुरू राहिला, मात्र वेस्ट इंडीजने 2006 मध्ये हिंदुस्थानविरुद्ध अखेरची एकदिवसीय मालिका जिंकली होती. त्यानंतर हिंदुस्थानने या कॅरेबियन संघाला सलग 12 एकदिवसीय मालिकेत लोळविण्याचा पराक्रम केलाय.

एका संघाविरुद्ध सर्वाधिक सलग मालिका विजय

 हिंदुस्थान वि. वि. वेस्ट इंडीज (12 वेळा)      –    2007 ते 2022

 पाकिस्तान वि. वि. झिम्बाब्वे (11 वेळा) –    1996 ते 2021

 पाकिस्तान वि. वि. वेस्ट इंडीज (10 वेळा)     –    1999 ते 2022

 दक्षिण आफ्रिका वि. वि. झिम्बाब्वे (9 वेळा)   –    1995 ते 2018

 हिंदुस्थान वि. वि. श्रीलंका (9 वेळा) –    2007 ते 2021

विंडीज दौऱयावर गेलेल्या हिंदुस्थानने सलामीचा सामना जिंकून एकदिवसीय मालिकेची झकास सुरुवात केली होती, मात्र रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या गैरहजेरीत हिंदुस्थानला दुसऱया सामन्यात पराभव पत्करावा लागला, मात्र आता हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ तिसरा व निर्णायक सामना जिंकून सलग 13 वी मालिका जिंकणार काय, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विक्रम हिंदुस्थानच्याच नावावर आहे. त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध सलग 12 एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. मंगळवारी त्या विक्रमाला आणखी उंचीवर नेण्याची टीम इंडियाला संधी असेल. या विक्रमाच्या बाबतीत पाकिस्तान दुसऱया स्थानावर आहे. त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध सलग 11 एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत.