तोडाबात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता …नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमुळे वन्यजीव धोक्यात

जंगल हे अनेकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. अनेकांना वन्य प्राणी बघायला, त्यांच्या दिनक्रम जाणून घेण्याची आवड असते. मात्र, काहीजण फक्त हुल्लडबाजी करण्यासाठी जंगलात येतात आणि जंगल सफारी करतात. अशा पर्यटकांमुळे वन्य प्राणीच संकटात येत आहेत. अशीच एक घटना ताडोबा अभयारण्यात घडली आहे. जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांनी ताडोबात म्हणजे वाघाच्याच घरात त्याचा रस्ता अडवला आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपल्यासाठी पर्यटन स्थळ आणि सफारीसाठी असलेले ठिकाण हे वन्यप्राण्यांचे घर असते. तो त्यांचा नैसर्गिक अधिवास असतो. त्याच परिसरात ते मोठे झालेले असतात. त्यातच अचानक पर्यटक समोर आले आणि वन्य प्राणी चवताळले किंवा त्यांनी बिथरून हल्ला केल्यास मोठा अनर्थ घडू शकतो.मात्र, ताडोबात आलेल्या काही पर्यटकांना याची जाणीव नाही, असेच या घटनेतून दिसून येत आहे.

देश-विदेश्यातील अनेक पर्यटक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. येथील वाघांनी अनेकांना भूरळ घातली आहे. त्यामुळेच दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. ताडोबात प्रवेश करण्यासाठी ताडोबा प्रशासनाने काही नियमावली बनवली आहे. मात्र, या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचा प्रकार शनिवारी घडला. आपल्या हक्काच्या मार्गांवरून ताडोबाच्या कोअर झोनमधून वाघ निघाला होता. त्यावेळी सफारीसाठी आलेले पर्यटक जिप्सीवर स्वार होते. जिप्सीमधील पर्यटकांनी वाघाला अक्षरशः घेरले. वाघाच्या हक्काच्या घरातच त्याचा रस्ता अडवण्यात आला. पर्यटकांच्या जिप्सीने घेरल्याने त्याला पुढे किंवा मागे जाता येत नव्हते. त्यामुळे वाघ भांबावला होता. मात्र, त्याने संयम बाळगला. तो चवताळला असता किंवा बिथरून हल्ला केला असता तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील मोहर्ली ते खटोडा या रस्त्यावर ही घटना घडली. ताडोबा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नियम मोडणाऱ्या अनेक घटना ताडोबात याआधीही घडल्या आहेत. मात्र, ताडोबा प्रशासनाने अद्यापही कार्यवाहीचा बडगा उचललेला नाही. ताडोबातील वाघांमुळे वन विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असतो. मात्र महसूल प्राप्तीसाठी वन्यजीवांच स्वातंत्र्य हिरावू बघणाऱ्या ताडोबा प्रशासनावर रोष व्यक्त केला जात आहे. तसेच प्राणीमित्रांनाही या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.