ट्रेकिंग महागात पडले; टोळीने मारहाण करून लुटले

रविवारी मुलुंडच्या वसंत गार्डन येथील डोंगरावर ट्रेकिंगसाठी जाणे तरुण-तरुणीला महागात पडले. ट्रेकिंग आटोपून घरी परतत असताना तीन जणांच्या टोळीने त्यांना अडवून जबर मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल, कॅमेरा आणि रोख रक्कम हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.

मुलुंडच्या वसंत उद्यान परिसरात असलेल्या डोंगरावर हिरल (29) व तिचा मित्र श्लोक (24) असे दोघे नियमितपणे ट्रेकिंगला जातात. त्याप्रमाणे 31 डिसेंबरच्या संध्याकाळीदेखील ते डोंगरावर ट्रेकिंगला गेले होते. तेथून पुन्हा माघारी परतत असताना तेथे वाटेत बसलेल्या तिघा तरुणांपैकी एकाने श्लोकला वेळ विचारला. त्या तरुणाला वेळ सांगण्यासाठी श्लोक थांबला असता त्याच्या खांद्यावरील सॅक बँग त्या तरुणाने हिसकावून घेतली व श्लोकच्या डोक्यात दगड मारला. त्यामुळे तो गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवरच कोसळला. त्यामुळे हिरल त्याच्या मदतीला सरसावली असता त्या तरुणांनी तिलाही लक्ष्य केले. आरोपींनी तरुण-तरुणीकडे असलेला मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दोघांच्या बॅगा घेऊन पळ काढला. त्यानंतर डोंगरावरून खाली उतरल्यानंतर हिरल हिने दिलेल्या तक्रारिवरून मुलुंड पोलीस ठाण्यात तीन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.