बंगळुरू बॉम्बस्फोटप्रकरणी कोलकात्यातून दोघांना अटक; एनआयएची कारवाई

 बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी पश्चिम बंगालमधून दोन मुख्य संशयितांना अटक केली. यात सूत्रधाराचाही समावेश आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने शुक्रवारी पश्चिम बंगालमधून दोन मुख्य संशयितांना अटक केली. या घटनेनंतर राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपदरम्यान शाब्दिक युद्ध सुरू झाले. या दोघांपैकी ताहा हा स्फोटाची योजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यामागील सूत्रधार होता आणि शाजिबने कॅफेमध्ये ‘आयईडी’ ठेवले, असे अधिकाऱयांचे म्हणणे आहे. एनआयए, केंद्रीय गुप्तहेर संस्था आणि पश्चिम बंगाल, तेलंगण, कर्नाटक व केरळ या राज्यांचे पोलीस यांच्या समन्वयाने दोघांना अटक करण्यात आली, अशी माहितीही अधिकाऱयांनी दिली. बंगळुरूमधील आयटीपीएल मार्ग, ब्रुकफिल्ड येथे स्थित असलेल्या लोकप्रिय आणि वर्दळीच्या रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी आयईडी स्फोट झाला होता. त्यानंतर 3 मार्चला ‘एनआयए’ने याचा तपास आपल्या हाती घेतला आणि दोन संशयितांबद्दल माहितीसाठी 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.