उद्धव ठाकरेंनी सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवार यांची भेट, वाचा काय झाली चर्चा?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, या भेटीविषयी विविध चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीविषयीचा खुलासा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मंगळवारी उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे चर्चा रंगू लागल्या होत्या.

सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकांचे लागलेले निकाल, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समितीची स्थापना, उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील टीका अशा विविध कारणांमुळे ही भेट होत असावी, असे कयास राजकीय वर्तुळात बांधले जात होते. मात्र, ही भेट निव्वळ कौटुंबिक स्वरुपाची असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. जवळपास 45 मिनिटं ही बैठक सुरू होती. पण ती कौटुंबिक स्वरुपाची असल्याने त्यात राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. तसंच, राजकीय बैठक नसल्याने काँग्रेस नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.