अल्टिमेट टेबल टेनिस आजपासून

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा टेबल टेनिसच्या थरारासाठी व्यासपीठ सज्ज झालं आहे. होय, इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) स्पर्धेचे चौथे पर्व उद्या गुरुवारपासून पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू होत आहे. गतविजेता चेन्नई लायन्स व पुणेरी पलटण यांच्यातील लढतीने या स्पर्धेचा शंखनाद होणार आहे.

13 ते 30 जुलैपर्यंत रंगणाऱया यंदाच्या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी 6 संघ कौशल्य पणाला लावणार आहेत. 12 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह एकूण 36 खेळाडू 18 दिवसांच्या कालावधीत सर्वस्व पणाला लावतील. एकूण 36 खेळाडूंपैकी 14 ऑलिम्पिकमध्ये खेळले आहेत, तर नऊ खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत आपले सामर्थ्य दाखवलेले आहे. गतविजेता चेन्नई लायन्ससह पुणेरी पलटण, बंगळुरू स्मॅशर्स, दबंग दिल्ली टीटीसी, गोवा चॅलेंजर्स आणि यू मुंबा टीटी हे संघ जेतेपदासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतील.

हिंदुस्थानचा सदाबहार खेळाडू अचंता शरथ कमलच्या नेतृत्वाखाली चेन्नई लायन्स खेळणार आहे.  तीन वर्षांनंतर अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धा पुन्हा सुरू होत असल्यामुळे साहजिकच आम्हाला आनंद झालाय. यूटीटी स्पर्धेचा थरारक उत्तरोत्तर रंगत जातो. अनेक तरुण खेळाडूदेखील या स्पर्धेतून पुढे येणार आहेत. हिंदुस्थानी टेबल टेनिससाठी ही खरोखरच मोठी गोष्ट आहे, असे  शरथ कमलने पत्रकार परिषदेत सांगितले.

दुसरीकडे, पुणेरी पलटण टेबल टेनिसची खेळाडू हाना मातेलोव्हादेखील हिंदुस्थानात खेळण्यासाठी उत्सुक आहे. या हंगामात संघाला नव्या उंचीवर नेण्यासाठी मी जिवाचे रान करीन, असा निर्धार तिने व्यक्त केला.

हिंदुस्थानची टेबल टेनिस सुंदरी मनिका बात्रा हीदेखील यंदाच्या स्पर्धेत मुख्य आकर्षण असेल. ती बंगळुरू स्मॅशर्सचे प्रतिनिधित्व करत आहे. ‘स्पर्धेच्या चौथ्या बरेच नवीन चेहरे आहेत आणि त्यांच्यासोबत खेळणे हा एक रोमांचक अनुभव असेल, कारण ते सर्व खरोखर प्रतिभावान आहेत. बंगळुरू स्मॅशर्स त्यांच्या प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतील,’ असे बात्राने म्हटले. दबंग दिल्ली टीटीसीचा साथियान ज्ञानसेकरन म्हणाला, ‘हिंदुस्थानातील टेबल टेनिस प्रतिभेला जोपासण्यात या लीगने मोठी भूमिका बजावली आहे. मी लहान वयात हा खेळ खेळायला सुरुवात केली आणि आता मी आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये हिंदुस्थानचा नियमित खेळाडू आहे. त्यामुळे, प्रत्येकासाठी ही एक उत्तम संधी आहे.