आताचा भाजप एक कोटीचा मंडप टाकतो, पैसे वाटतो; उमा भारती यांचा पुन्हा हल्लाबोल

uma-bharti

भाजपमध्ये आता ‘वापरा आणि फेकून द्या’ असे धोरण आले आहे, अशा शब्दांत स्वपक्षावर हल्ला करणाऱया उमा भारती यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. आम्ही लहानपणापासून प्रवचन करीत होतो. त्या वेळी पोस्टर, होर्डींग, लंच पॅकेट, गाडय़ा भरून आणण्यासाठी प्रतिव्यक्ती 500 रुपये दिले जात नव्हते. एक कोटीचा मंडप टाकला जात नव्हता. आजच्या भाजपला हे सर्व करावे लागतेय. आम्हाला हे करायची गरज पडली नाही, अशा शब्दांत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी पुन्हा एकदा स्वपक्षावर निशाणा साधला आहे.

भाजपकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर उमा भारती यांचा फोटो नाही. त्यावर त्यांनी संताप व्यक्त करीत याची मला गरज नाही असे म्हटले. मी नेहमी सांगते की, क्रोध करू नका. परंतु मला राग येतो. मी बोलते की, लोभ धरू नका, परंतु मला चांगल्या गाडय़ा पसंत आहेत. त्यामुळे मी उपदेश देण्याच्या भानगडीत पडत नाही. परंतु राजकारणात माझे मन आणि वचन आणि कर्म यांच्यात सुसंगत आहे. जे मी विचार करते तेच करते, असे उमा भारती म्हणाल्या.