शिमग्यात कोकणात अवकाळी पावसाचे धुमशान! सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने आंबा, काजू पीक आले धोक्यात

कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस कोसळला. या पावसाचा ऐन हंगामात असलेल्या आंबा, काजू, कोकम पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असून शेतकरी, बागायतदार धास्तावले आहेत. दरम्यान या पावसाच्या शिडकाव्यानंतर वातावरणात बदल होत उष्म्यात प्रचंड वाढ झाली आहे.

सध्या उन्हाळा सुरू असून वातावरणात प्रचंड प्रमाणात उष्मा वाढला आहे. त्यातच शुक्रवारी रात्री जिह्यातील कुडाळ, सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. काही वेळ पावसाचा शिडकावा झाला. चार दिवसांपूर्वीच कुडाळ तालुक्यातील डिगस पंचक्रोशीत अवकाळी पाऊस कोसळला होता. सध्या आंबा, काजू पिकांचा हंगाम सुरू आहे. या पिकांची मोठय़ा प्रमाणात काढणी सुरू आहे. त्यामुळे ऐन हंगामातच अवकाळी पाऊस कोसळल्याने या पिकांसह कोकणी मेव्याला धोका निर्माण झाला आहे. अंतिम टप्प्यातील मोहोर गळती होऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी बागायतदारांमधून व्यक्त होत आहे. आंबा, काजू पिकासह कोकम पिकालाही फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या मोठय़ा मार्केटमध्ये आंब्यांचे दर घसरल्याने बागायतदार आधीच नाराजीत आहेत. काजू बीला चांगला दर मिळत नसल्याने काजू उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. त्यातच अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाल्याने पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बागायतदार वर्ग चिंतेत सापडला आहे.

सावंतवाडीत उडाली तारांबळ; उष्णतेत कमालीची वाढ
शहरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळणाऱया रिमझिम पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. वाढता उष्णा लक्षात घेता अचानक पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचे मोठे नुकसान संभवत असून रात्री पडलेल्या पावसामुळे सकाळपासून उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. अंगातून घामाच्या धारा वाहणारा उकाडा दिवसभर नागरिकांनी अनुभवला. दरम्यान, हा पाऊस फक्त सावंतवाडी शहरामध्ये काही ठिकाणी पडला, तर तालुक्यामध्ये काही ठिकाणी केवळ पावसाच्या सरी कोसळल्यामुळे तालुक्यात कमालीची उष्णता वाढली आहे.