मुंबई विमानतळावर व्हिलचेअर न मिळाल्याने वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

मुंबई विमानतळावर व्हिलचेअरअभावी एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेष्ठ नागरिकांना व्हीलचेअर उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे त्यांना पायपीट करत इमिग्रेशन काउंटरपर्यंत जावे लागले. त्यांच्या वयोमानानुसार त्यांना फार वेळ चालणं जमलं नाही आणि त्यामुळे वृद्धाचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली असल्याचे समजले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे 80 वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नीसोबत एअर इंडियाच्या विमानाने न्यूयॉर्कहून आले होते. या व्यक्तीने स्वतःसाठी आणि त्याच्या पत्नीसाठी व्हीलचेअरची सुविधा आधीच बुक केली होती. मात्र, विमानतळावर व्हीलचेअर नसल्यामुळे वृद्ध जोडप्याच्या मदतीसाठी सहाय्यक एकच व्हीलचेअर घेऊन आला. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला व्हिलचेअरवर बसवलं आणि स्वत: त्यांच्यासोबत चालत होते. ते सुमारे दीड दीड किलोमीटर चालले.इमिग्रेशन काउंटर परिसरात पोहोचेपर्यंतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच कोसळले. यानंतर, त्या व्यक्तीला तत्काळ मुंबई विमानतळाच्या वैद्यकीय सुविधेत नेण्यात आले. परंतु त्यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना लगेचच नानावाटी रुग्णालयात नेण्यात आले.

या वृद्ध जोडप्याने न्यूयॉर्कहून मुंबईला इकॉनॉमी क्लासमध्ये एअर इंडियाच्या एआय-116 या विमानाने प्रवास केला होता. हे विमान सोमवारी सकाळी 11.30 वाजता उतरणार होते, मात्र ते दुपारी 2.10 वाजेपर्यंत उशीर झाले. ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूच्या घटनेबद्दल एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, व्हीलचेअरची प्रचंड मागणी असल्याने आम्ही प्रवाशाला व्हीलचेअरची मदत मिळेपर्यंत थांबण्याची विनंती केली होती. परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही. त्यांनी एक व्हिलचेअर आपल्या पत्नीला दिली आणि ते त्यांच्यासोबत चालत पुढे गेले. त्यामुळे ही घटना घडली आहे. परंतु आमची संपूर्ण टीम त्यांच्या दु:खात सहभागी आहे. आमची एजन्सी त्यांना संपूर्ण सहकार्य करलेच असे ते म्हणाले.