ब्रम्हचर्याचा त्याग करण्यास महिलेचा नकार, शरीर संबंध ठेवू देत नसल्याने पतीची न्यायालयात धाव

गुजरात उच्च न्यायालयाने नवऱ्याकडून दाखल करण्यात आलेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर आदेश सुनावला आहे. न्यायालयाने या नवऱ्याच्या बाजूने आदेश देत त्याची घटस्फोटाची विनंती मान्य केली आहे. या नवऱ्याने याचिका करताना म्हटले होते की त्याच्या पत्नीने लग्नानंतर शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. या जोडप्याचे लग्न 2009 साली झाले असून तिला दुभंग व्यक्तिमत्वाचा मानसिक आजार होता. नवरा डॉक्टर असून ही महिला आयुर्वेदीक डॉक्टर आहे. लग्नानंतर या महिलेने नवऱ्याला एकदाही शरीरसंबंध ठेवू दिले नाहीत.

नवऱ्याने खरंतर 2012 सालीच घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यात त्याने म्हटले होते की आपल्या पत्नीला मानसिक आजार असून ती एका आध्यात्मिक पंथाची अनुयायी आहे. या पंथामुळेच तिने नवऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. नवऱ्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता तिने धमकी दिली की माझे ब्रम्हचर्य मोडले तर आत्महत्या करेन. पतीने म्हटले होते की बायकोच्या मानसिक आजाराबद्दल त्याला काहीच माहिती नव्हते. बायकोच्या घरच्यांनी ही बाब लपवून ठेवणे ही देखील एक प्रकारची क्रूरताच असल्याचे या नवऱ्याचे म्हणणे आहे. 2018 साली कुटुंब न्यायालयाने या प्रकरणी आदेश दिला होता मात्र तो नवऱ्याच्या बाजूने नव्हता. यानंतर नवऱ्याने आपले पुरावे आणखी भक्कम करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नवऱ्याने त्याच्या बायकोवर स्किझोफ्रेनियाचा इलाज करणाऱ्या डॉक्टरांना आणि इतर प्रत्यक्षदर्शींनाही न्यायालयासमोर हजर केलं होतं. या सगळ्यांनी सांगितलं की ही महिला तिच्या सासरी 2011 सालापासून राहात नाहीये. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर नवऱ्याने केलेली घटस्फोटाची विनंती मंजूर केली.