विविध मागण्यांसाठी वरळी बीबीडी रहिवाशांचे आंदोलन

 बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील काही अटींबाबत आक्षेप असल्याने बीडीडीवासीयांनी आज जांबोरी मैदानात जनआंदोलन केले. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी धडकणार होते. मात्र, वरळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. यावेळी पोलिसांनी रहिवाशांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

करारनाम्यातील लाभार्थी, पुनर्वसन आणि पुनर्वसित या जागी पुनर्विकास, पुनर्विकसित या शब्दांचा उल्लेख करावा, संक्रमण शिबीर वरळीतच असावे, घरभाडे 25 हजार रुपयांऐवजी वाढवून 35 हजार करावे, दरवर्षी 10 टक्के भाडेवाढ मिळावी, तीन वर्षांचे भाडे एकत्रित द्यावे, या व्यतिरिक्त एक महिन्याचे ब्रोकरेज द्यावे, देखभाल खर्च 12 वर्षांऐवजी आजीवन देखभाल खर्च करांसहित द्यावा या मागण्यांसाठी हे जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वरळी, नायगाव, डिलाईल रोड बीडीडी चाळीतील रहिवासी सहभागी झाले होते.