हरयाणात भाजप सरकार गॅसवर; फ्लोअर टेस्टची मागणी

तीन अपक्ष आमदारांनी पाठींबा काढून घेतल्याने हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात आले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचे नेतेही सक्रीय झाले आहेत. जेजेपीचे नेते माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांना पत्र लिहून प्लोअर टेस्टची मागणी केली आहे. तर माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेस नेते भुपिंदर सिंग हुड्डा यांनीही आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली आहे. यामुळे हरियाणातील भाजप सरकार गॅसवर आले आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तीन अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी खुर्ची धोक्यात आली आहे. सैनी यांचे सरकार अल्पमतात आल्यानंतर काँग्रेसने शेवटचा दे धक्का द्यावा, आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत असे आवाहन जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनी केले होते. त्यानंतर काँग्रेसनेही आज राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांच्याकडे पत्राद्वारे शुक्रवारी भेटीची वेळ मागित तत्काळ बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे.

हरयाणामध्ये राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जननायक जनता पार्टीचे प्रमुख  दुष्यंत चौटाला यांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावून फ्लोअर टेस्ट घेण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. भाजपकडे बहुमत सिद्ध करता येईल एवढी आमदारांची संख्या नाही. त्यामुळे सैनी सरकारला सत्तेत राहाण्याचा अधिकार नाही. तत्काळ बहुमत चाचणी झाली पाहिजे अशी मागणी बुधवारीच त्यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे.