2007 ची नुकसानभरपाई आता होणार, ब्रायन लाराचे भाकीत

जसजसे टी-20 वर्ल्ड कपची तारीख जवळ येतेय, तसतसे वर्ल्ड कपचा अंदाज वर्तवण्याची स्पर्धाही रंगू लागलेय. काही दिवसांपूर्वी मायकल वॉनने हिंदुस्थानचा संघ सुपर एटमध्येच बाद होणार असल्याचे टुकार भाकीत वर्तवले होते तर आता विश्वविक्रमवीर फलंदाज ब्रायन लाराने भविष्यवाणी केलीय की जे 2007 साली घडलं नव्हतं ते 2024 मध्ये घडणार आहे. हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज हे दोघे जगज्जेतेपदासाठी भिडतील आणि 2007 ची नुकसानभरपाई करतील, असा अंदाज वर्तवला आहे.

2007 साली वेस्ट इंडीजने प्रथमच वन डेच्या वर्ल्ड कपचे आयोजन केले होते. या स्पर्धेतही हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यात जगज्जेतेपदाची लढत रंगेल, असा साऱयांचा अंदाज होता. पण हिंदुस्थानचा संघ अनपेक्षितपणे साखळीतच गारद झाला आणि यजमान विंडीजला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. जे 2007 घडले ते पुन्हा घडावे अशी कुणाचीच इच्छा नाही. मागे झालेले नुकसान हिंदुस्थान-विंडीज फायनलने भरून निघेल. यंदा हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यात जगज्जेतेपदाचे युद्ध रंगावे आणि जो सर्वोत्तम संघ असेल तो जिंकावा, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे.

सूर्याने तिसऱया स्थानावर खेळावे

हिंदुस्थानचा संघ तगडा आहे. हिंदुस्थानने आपल्या फलंदाजीची ताकद वाढवण्यासाठी सूर्यकुमारला तिसऱया क्रमांकावर खेळवावे. तो टी-20 चा महान फलंदाज आहे. तो लवकर उतरला तर संघाला विजयी धावसंख्या उभारून देईल आणि दुसऱया डावात तो संघाला विजय मिळवून देईल. चार फिरकीवीरांमुळेही हिंदुस्थान बलाढय़ संघ भासू लागलाय, पण हिंदुस्थान चार फिरकीवीर खेळवणार नाही. पण युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव प्रतिस्पर्ध्यांच्या धावांवर बंधने आणतील.

अफगाणिस्तानच डार्क हॉर्स

अफगाणिस्तानचा संघच यंदाचा खरा डार्क हॉर्स असून तो उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ असेल. इंग्लंडचा जगज्जेता संघही उपांत्य फेरी गाठेल, असा अंदाज लाराने बोलून दाखवला आहे. अफगाणी खेळाडू आयपीएलमध्ये प्रचंड मेहनत करत आहेत. त्यांचा अद्भुत खेळ संघाला उपांत्य फेरी गाठून देईल, असा अंदाज व्यक्त करत लाराने दिग्गज संघांना धक्का दिला आहे.