मोदींचे मानसिक संतुलन बिघडलेले; त्यांची गाडी रुळांवरून घसरली, संजय राऊत यांचा घणाघात

‘देशाचे पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांची प्रकृती बरी नाही, हे चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही. त्यांची गाडी रुळावरून घसरली असून, भाजपने त्यांना तत्काळ प्रचारातून बाजूला करायला हवे,’ असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, ‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. 10 वर्षांपासून ते पंतप्रधानपदावर असून, तिसऱयांदा सार्वत्रिक निवडणुकीस सामोरे जात आहेत. त्यांनी देशाचे भवितव्य, विकास, लोककल्याण याविषयी भूमिका मांडायला हव्यात. त्यांना तिसऱयांदा का निवडून द्यावे? 10 वर्षांत काय कामं केली, हे सांगायला हवे. पण आतापर्यंत एकाही प्रचारसभेत त्यांनी अशाप्रकारची भूमिका मांडलेली नाही. त्यांची गाडी पूर्णपणे रुळावरून घसरलेली आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्ती प्रचारात काहीही बरळू लागतो, याचा अर्थ त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांच्या बोलण्यातून हे जाणवत आहे. हे चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

देशातील काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैसा नष्ट करेन, असे वचन त्यांनी दिले होते. तेच मोदी आता अदानी-अंबानींचा काळा पैसा टेम्पो करून काँग्रेसकडे जातोय, असे म्हणत आहेत. याचा अर्थ मोदींना या भ्रष्टाचाराच्या व्यवहाराची माहिती असून, पीएमएलए कायद्यानुसार त्यांनी तत्काळ त्या उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

मिंधेच तडीपार होतील

4 जूनपर्यंत काय तांडव करायचे ते करा. सगळे गुंड सध्या तुरुंगातून सोडवून मिंधे आणि त्यांच्या मुलाबरोबर फिरत आहेत. स्वतः मिंधे तडीपार होतील, असे गुन्हे त्यांचे आहेत. त्यांच्या टोळीचे एवढे अपराध आहेत की, त्यांनाही तडीपारीची नोटीस बजावली जाईल किंवा तुरुंगात जातील. तेव्हा मोदी, शहा, फडणवीस वाचवायला येणार नाहीत, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

अजित पवारांना खोटं बोलण्याचा कोरोना!

अजित पवार खोटारडे आहेत. ते खोटे बोलत आहेत. शरद पवार कधीच अशा पद्धतीने बोलत नाहीत. पण, एक नक्की लक्षात ठेवा, आगामी काळामध्ये मिंधे आणि अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही. त्यांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये राहणार नाही, अजित पवार यांना खोटं बोलण्याचा त्यांना कोरोना झाला आहे, खोटं बोल; पण रेटून बोल, अशी यांची मानसिकता आहे, असे संजय राऊत म्हणाले.