हिंदुस्थानात हिंदूंची संख्या घटली, मुस्लीम वाढले! ऐन निवडणुकीत मोदी सरकारचा धर्माच्या आधारावर अहवाल

देशातील हिंदूंची संख्या घटली असून मुस्लिमांची संख्या वाढली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीतच मोदी सरकारने हा अहवाल का प्रसिद्ध केला आणि जनगणना न करताच कोणत्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला, असा सवाल विरोधकांनी केला आहे. महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

1950 ते 2015 दरम्यान देशात हिंदूंची लोकसंख्या 7.82 टक्क्यांनी घटल्याचे आणि मुस्लिमांची लोकसंख्या 43.15 टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. देशातील मुस्लिमांची एकूण लोकसंख्या 1950 मध्ये 9.84 टक्के होती. ही लोकसंख्या 2015 मध्ये 14.9 टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात दाखवले आहे. ‘धार्मिक अल्पसंख्याकांचे देशभरातील विश्लेषण’ या मथळय़ाखाली अहवाल सादर केला आहे. हिंदुस्थानात जैन धर्मीयांची लोकसंख्या 1950 साली असलेल्या 0.45 टक्क्यांवरून 2015 पर्यंत 0.36 टक्क्यांपर्यंत घटल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तान, अफगाणिस्तानात अल्पसंख्याक घटले

– ख्रिश्चन धर्मीयांची लोकसंख्या 2.24 टक्क्यांनी वाढून 2.36 इतकी झाली आहे. तर शीख धर्मीयांची लोकसंख्या 1.24 टक्क्यांनी वाढून 1.85 टक्के झाली आहे. पारशींच्या लोकसंख्येत तब्बल 85 टक्क्यांची घट झाली आहे. पारशी धर्मीयांची लोकसंख्या 1950 मध्ये 0.03 टक्के होती ती 2015 पर्यंत 0.004 टक्क्यांपर्यंत घटली.

– पाकिस्तान, बांगलादेशात मुस्लिमांची संख्या वाढली असून तेथील अल्पसंख्याक घटले आहेत. बांगलादेशात मुस्लिमांच्या संख्येत 18.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ मुस्लिमांच्या संख्येत पाकिस्तानात 3.75 टक्के तर अफगाणिस्तानात 0.29 टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

हा तर व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी रिपोर्ट – ओवैसी

मोदी सरकारचा हा व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी रिपोर्ट असल्याचे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता मला तो अहवाल आणून द्या मग मी त्यावर बोलेन, असे उत्तर त्यांनी दिले. हा व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी अहवाल कुणाचा आहे? कुणी बनवला, असा सवालही त्यांनी केला.

हा अहवाल आताच कसा आला?

प्रियांका गांधी या रायबरेलीतील एका प्रचारसभेत असताना पत्रकारांनी त्यांना हिंदूंच्या संख्येत घट झाल्याप्रकरणी आपले काय म्हणणे आहे, असा प्रश्न विचारला. यावर मोदी सरकारकडे हा मुद्दा कुठून आला हे त्यांनाच जाऊन विचारा, असा उलट सवाल प्रियांका गांधी यांनी पत्रकारांना केला. तसेच भाजपा महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न

हिंदू आणि मुस्लिमांची लोकसंख्या दाखवून मोदी सरकार दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला आहे. जनगणना न करताच पेंद्र लोकसंख्या कशी काय सांगू शकते, असा सवालही त्यांनी केला आहे. महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच हा अहवाल समोर आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.