डिलिव्हरी बॉयचा रडतानाचा फोटो व्हायरल, बहिणीच्या लग्नासाठी लोकांकडून मदत मागण्याची वेळ

फूड डीलिव्हरी कंपनी Zomato अनेकवेळा तिच्या जाहिरातीवरून किंवा डिलिव्हरीच्या वेळेवरून वादात सापडली आहे. याबाबातचे त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आता झोमॅटोमध्ये काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजधानी दिल्लीतील जीटीबीनगर भागात काम करणारा आयुष सैनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयुष बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमवत होता. पण झोमॅटोने त्याचे खाते अचानक ब्लॉक केले. त्यामुळे बहिणीच्या लग्नासाठी आता त्याला लोकांकडे मदत मागावी लागत आहे.

दरम्यान, आयुष सैनीचा रडतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोहम भट्टाचार्य नावाच्या युजरने आयुषची ही कहाणी ट्विटरवर शेअर केली आहे. सोहमच्या पोस्टनुसार, आयुष सैनी सध्या आर्थिक संकटातून जात आहे. त्याच्या बहिणीचे लग्न  येत्या काही दिवसांत होणार आहे. अशातच कंपनीने त्याचे खाते ब्लॉक केले आहे. सोहमने 28 मार्च रोजी आयुषचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यामुळे अनेक युजर्सनी आयुषच्या समर्थनार्थ कमेंट्स केल्या आहेत. तर झोमॅटोचा निषेध केला आहे.

मी आयुषला भेटलो तेव्हा तो खूप रडत होता. तो का रडतोय? याची विचारणा केल्यावर मला हा सगळा प्रकार समजला. आयुष येणाऱ्या-जाणाऱ्या सगळ्यांकडेच मदत मागत होता. तो पैसे जमावण्यासाठी दिवसभर उपाशी राहतो. त्यामुळे सोहमने लोकांना आयुषची ही कहाणी शक्य तितकी व्हायरल करण्याचे आवाहन केले. सोहमने त्याच्या पोस्टसोबत एक आयुषचा QR कोड देखील शेअर केला. ज्यामुळे त्याला मदत होऊ शकते.

झोमॅटोने काय म्हटले?

झोमॅटो केअरने सोहमच्या पोस्टला रिप्लाय देत स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही आयडी ब्लॉक करण्यासारख्या कृतींचा परिणाम समजतो. त्यामुळे आम्ही शक्य तितक्या लवकर हा प्रश्न सोडवू. कंपनीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे झोमॅटोकडून देण्यात आले आहे.