चाचांच्या तावडीतून 17 जणांची सुटका

3 महिन्यांपूर्वी एडनच्या आखातात अपहरण झालेल्या एमव्ही रौन या जहाजाच्या सुटकेसाठीचे ऑपरेशन हिंदुस्थानी नौदलाने यशस्वीरित्या पूर्ण केले. या जहाजावरील 35 सोमालियन समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केले आणि 17 क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. हिंदुस्थानच्या किनारपट्टीपासून 2800 किलोमीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. तब्बल 40 तास हे बचावकार्य चालले.

युद्धनौका आयएनएस सुभद्रा. ड्रोन, गस्त घालणारे विमान यांच्या माध्यमातून नौदलाने लष्कराच्या मदतीने या जहाजाचा शोध घेतला. कारवाई करण्यापूर्वी नौदलाने चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. आत्मसमर्पण केले नाही तर या चाच्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश मरीन कमांडोंना देण्यात आले होते. हिंदुस्थानी नौदलाचा शुक्रवारीच या जहाजाशी संपर्क झाला होता. यावेळी चाच्यांनी नौदलावर गोळीबारही केला होता. 14 डिसेंबर रोजीही चाच्यांनी माल्टा जहाज एमव्ही रौनचे अपहरण केले होते. या जहाजाचा वापर समुद्रात दरोडा टाकण्यासाठी करण्यात येत होता.

अशी केली कारवाई

15 मार्च रोजी हिंदुस्थानी नौदलाचे हेलिकॉप्टर जहाजाजवळ पोहोचले. हॅलीकॉप्टर दिसताच सोमालियन चाच्यांनी गोळीबार केला. नौदलानेही चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगत कडक कारवाईचा इशारा दिला. अखेर चाच्यांनी शरणागती पत्करत आत्मसमर्पण केले.

जहाजाला बनवले होते तळ

दरोडेखोरांनी एमव्ही रौन जहाजाचा बेस म्हणून वापर करण्यास सुरुवात केली होती. 14 मार्च रोजी चाच्यांनी अब्दुल्ला या बांगलादेशी ध्वज असलेल्या जहाजावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. 15 ते 20 सशस्त्र दरोडेखोरांनी जहाजावर हल्ला केला. ते मोझांबिककडून युएईकडे जात होते. मात्र, हिंदुस्थानी नौदलाने त्यांची सुखरुप सुटका केली.