वक्त्याकडे हवा आत्मविश्वास!

>> किरण खोत, निवेदक, सूत्रसंचालक

वक्त्याचा आत्मविश्वास हा त्याच्या भाषणात प्रमुख भूमिका निभावतो…

आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. संभाषण किंवा संवाद यशस्वी करण्यासाठी वक्त्याकडे हवा असतो तो आत्मविश्वास. एखाद्या विषयावर बोलण्यासाठी आपण जेव्हा तयार होतो, तेव्हा जर आपल्या अंतर्मनातून एक सकारात्मक आवाज येत असेल की, होय मी या विषयावर मार्गदर्शन करण्यास उत्सुक आहे आणि तयारसुद्धा, तर तो संवाद किंवा ते भाषण अतिशय सुंदर पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचते. परंतु याउलट जर वक्त्यालाच बोलताना मनात कुठेतरी संभ्रम असेल, शंकेची पाल चूकचुकत असेल तर तो उपस्थित लोकांसमोर चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडताना मधेच अडखळतो. वक्त्याचा आत्मविश्वास हा त्याच्या भाषणात प्रमुख भूमिका निभावतो.

हा आत्मविश्वास वाढण्यासाठी अनेक उपाययोजनांचा उपयोग करता येतो. यात वेगवेगळय़ा पैलूंवर वक्त्यांना लक्ष द्यायला हवे. त्यात सर्वप्रथम येते ते आरोग्य. ज्या माणसाचे आरोग्य चांगले व जो माणूस सुदृढ तो यशस्वी. स्टेजवर उभे राहताना किंवा एखादे सादरीकरण करताना शारीरिकदृष्टय़ा जर वक्ता निरोगी असेल तर त्याला प्रेझेंटेशन करताना किंवा सादरीकरण करताना एक वेगळाच त्याचा आत्मविश्वास उच्च पातळीचा असतो. याउलट जर तो आजारी असेल, त्याचा आवाज बसला असेल, त्याला सर्दी व खोकला किंवा थंडी ताप असेल तर त्याचा परिणाम त्याच्या बोलण्यावर होत असतो. जितका माणूस शरीराने तंदुरुस्त असायला हवा तितकाच तो मनानेसुद्धा खंबीर असायला हवा. त्यासाठी त्याचे वाचन, त्याची निरीक्षण क्षमता, त्याची ऐकण्याची क्षमता या सगळय़ा गोष्टींवर त्याने योग्य पद्धतीने काम करायला हवे.

शरीराने आणि मनाने तंदुरुस्त असणाऱया व्यक्तीला आणखीन एका गोष्टीची मदत होते, ती म्हणजे त्याचे लोकांशी असणारे नातेसंबंध. जेव्हा श्रोत्यांशी आपुलकीच्या नात्याने बांधला गेलेला असतो तेव्हा संवाद यशस्वी होतो. वक्ता आणि श्रोता यांच्यातली नाती हीसुद्धा अतिशय महत्त्वाची असतात. अर्थातच शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच श्रद्धा. आपण श्रद्धेने रंगभूमीला, रंगदेवतेला केलेला नमस्कार महत्त्वाचा ठरतो. आपण कितीही तयारी केली तरीसुद्धा एक वैश्विक शक्ती आपल्याला आपले सादरीकरण करण्यासाठी मदत करत असते. त्या वैश्विक शक्तीला संपूर्ण शरणागत होऊन रसिक श्रोत्यांना आपला देव मानून आयोजकांना आपले दैवत मानून जो वक्ता संभाषण करतो, तो आपल्या संवादाने पूर्ण तयारी करून लोकांची मने अगदी सहजगत्या जिंकून घेतो. कुठल्याही संभाषणाअगोदर येणारा अंतर्मनाचा आवाज असतो तो जर सकारात्मक असेल तर ते संभाषण नक्कीच यशस्वी होते. त्यामुळे आपल्या शरीराची अर्थात प्रकृतीची काळजी घ्या. मन निरोगी आणि निकोप ठेवा. लोकांसमोर चांगले संबंध जोडा आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवा. या चार गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमचे संभाषण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.