प्रॉमिसिंग; प्रेक्षकांशी जडले नाते

>> गणेश आचवल

झी मराठीवर नुकतीच ‘शिवा’ नावाची एक मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत आशुतोष ही व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार म्हणजे शाल्व किंजवडेकर… एक प्रॉमिसिंग चेहरा.

शाल्वचे शालेय शिक्षण पुण्यातील अक्षरनंदन शाळेत झाले. लहानपणापासून अभिनयाची त्याला आवड होती. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात तो सातत्याने सहभागी होत होता. शाल्व सांगतो, ‘‘दहावीच्या सुट्टीत मी पुण्यातील सुदर्शन रंगमंच संस्थेशी जोडला गेलो. या संस्थेतून विविध नाटकांत भूमिका करून मला खूप काही शिकता आले. मी फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश घेतला आणि तेथून मास मीडियामधून ग्रॅज्युएट झालो. कॉलेजला असतानाच मी ‘हंटर’ या सिनेमात काम केले. आपण चित्रपट या माध्यमाचे रीतसर प्रशिक्षण घ्यायला हवे असे वाटून मी या माध्यमाचा अभ्यास करण्याच्या हेतूने उमेश कुलकर्णी यांची चित्रपट रसास्वाद कार्यशाळा केली. त्यातूनदेखील खूप शिकता आले.’’

शाल्वने त्याचदरम्यान ‘जरा हट के’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ हे चित्रपट केले. कॉलेजमध्ये असताना नाटय़वाचन स्पर्धेत त्याचा सहभाग होता. मात्र त्याच काळात विविध चित्रपटांत व्यस्त असल्याने शाल्वला इच्छा असूनदेखील एकांकिका स्पर्धा करता आल्या नाहीत. शाल्वने वेब सीरिज या माध्यमातदेखील काम केले. ‘सेक्स’, ‘ड्रग्ज अॅण्ड थिएटर’ तसेच ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजमध्येदेखील त्याच्या भूमिका होत्या. ‘बकेट लिस्ट’, ‘एक सांगायचंय’ या चित्रपटांतदेखील त्याच्या भूमिका होत्या. झी मराठीवरील दोन मालिकांविषयी तो सांगतो, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेमुळे मी घराघरात पोहोचलो. टीव्ही माध्यमाची ताकद काय असते हे जाणवले. आता पुन्हा नुकत्याच सुरू झालेल्या ‘शिवा’ या मालिकेमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांशी नाते जोडले जात आहे. ‘शिवा’ मालिकेत मी आशुतोष ही व्यक्तिरेखा साकारत आहे. श्रीमंत घरात वाढलेला आणि अतिशय लाडावलेल्या मुलाची ही भूमिका आहे. त्याने बाहेरचे जग पाहिलेले नाही. एका घटनेमुळे त्याची भेट शिवाबरोबर होते आणि मग काय घटना घडत जातात, हे तुम्हाला या मालिकेतून कळेल.

रंगभूमी, चित्रपट, वेब सीरिज आणि दैनंदिन मालिका अशा सर्व माध्यमांतून शाल्व किंजवडेकर याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.