Lok Sabha Election 2024 : खोके सम्राट, पलटुसम्राट परवडत नाही, अमोल कोल्हेंची टीका

महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या जाहीर सभेतून कोल्हे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

या सभेत बोलताना कोल्हे म्हणाले की, आता फक्त ट्रेलर दाखवतो. पिक्चर दाखवायला आपल्याकडं लय वेळ हाय. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेचे ठरलंय, बळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवायची अन् विजयाची तुतारी फुंकायची. मी पहिल्यांदा संसदेत गेलो तेव्हा मला सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते की, जेव्हा जनतेच्या धोरणाविषयी चर्चा होईल, देशाच्या भवितव्याविषयी चर्चा होईल तेव्हा डोळ्यात तेल घालून जागा राहा. तेव्हा तुझा आवाज सर्व सामान्य लोकांसाठी गरजला पाहिजे, हे सुप्रिया सुळेंनी मला शिकवले असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे म्हणाले की, नटसम्राट परवडतो, कार्यसम्राट परवडतो. पण धोके सम्राट, खोके सम्राट, पलटुसम्राट परवडत नाही. आता हे म्हणतायेत कचाकचा बटन दाबा, पाहिजे तेवढा निधी देतो. कर काय ह्यांच्या खिशातला आहे का? अहो आम्हा जनतेकडून तुम्ही कर घेता अन् त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकचा बटन दाबायला सांगता का? असा सवाल देखील अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.