ओंकार स्वरूप गणेश

>>सीए अभिजित कुळकर्णी

ईश्वर सदैव विद्यमान आहे हा आस्तिक्यभाव म्हणजेच ईश्वरप्रणिधान किंवा भक्तियोग.

भक्तिभाव वृद्धिंगत होण्यासाठी ईश्वराला एखाद्या साकार स्वरूपात भजावे लागते. असेच एक सुंदर, मनमोहक, मंगल स्वरूप म्हणजेच मंगलमूर्ती गणेश.

ॐ गं गणपतये नमः – योगी ज्याचे नित्य ध्यान करतात, जो मूलाधार चक्राचा स्वामी आहे, अशा ओंकारस्वरूप गणेशाला मी वंदन करतो. ॐ कार, गणेश आणि योगाभ्यासातील गणेशाचे स्थान याबद्दल आपण आधी एका लेखामध्ये ऊहापोह केलेला आहे.

गणेशाच्या सुंदर स्वरूपावर आपले मन सहजपणे एकाग्र होते आणि त्याभोवती असलेल्या श्रद्धेमुळे आपला दिवस शुभ होतो, मंगल होतो, सर्व विघ्नांचा नाश होतो. म्हणून गणेशाचे ध्यान करावे. गणेशाला वंदन करावे. आज माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा श्री गणेश आणि योग या विषयावर चिंतन करू.

या पवित्र दिवसांत सकाळी शुचिर्भूत होऊन आपली दैनंदिन आन्हिके उरकून घ्यावीत आणि मग एका आसनावर स्थिर बसावे. पाठीचा कणा सरळ ताठ ठेवावा. आपल्या मनाला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यावे. मनातले विचार, तणाव, चिंता, असूया, राग, द्वेष, हेवेदावे दूर करावेत आणि स्वच्छ मनाने मंगलमूर्ती गणेशाचे चिंतन करावे. सर्वप्रथम तेजोमय स्वयंप्रकाशी दिव्य अशा गौरीनंदन गणेशाची मूर्ती आपल्या मनामध्ये भ्रूमध्यामध्ये स्थिर करावी. गणेशाच्या दिव्य तेजाने आपले मन उजळून निघाले आहे, अशी कल्पना करावी आणि नंतर निश्चिंत मनाने काही काळपावेतो या मंगलमूर्ती गणेशावर आपले ध्यान स्थिर करावे. गणेशाच्या दिव्य मंत्राचा ‘ॐ गं गणपतये नमः’ जप करावा. मंत्राच्या उच्चारणाने उत्पन्न होणाऱया नाद लहरी शरीराच्या रोमारोमांत सामावल्या जात आहेत आणि त्यामुळे आपले शरीर आणि मन पुलकित होऊ द्यावे. मंगलमूर्तीच्या ध्यानाने आपले मन प्रसन्न होते, आनंदित होते. आनंद आणि प्रसन्नता म्हणजेच मोद आणि गणेश मोदकप्रिय आहे हे ध्यानात ठेवावे.

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!

योगशिक्षक, भारतीय योग मंदिर www.bymyoga.in