खरंच असतो का कॅशलेस मेडिक्लेम…

>>  चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

कॅशलेस मेडिक्लेम असं ऐकल्यावर, ‘‘चला बुवा, आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पैसे भरायची गरज नाही’’ अशीच धारणा होते, पण सत्य काय आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

आज कुठल्याही हॉस्पिटलला ऍडमिट केल्यावर हॉस्पिटल डिपॉझिट ठेवायला सांगते. ही रक्कम 25 हजारांपासून अगदी लाखाच्या वरही असू शकते. माझी मेडिक्लेम पॉलिसी कॅशलेस आहे हे कितीही बोंबलून सांगितल्यावरही हॉस्पिटल नॉर्मनुसार डिपॉझिट भरावंच लागेल असं निक्षून सांगितल्यावर आपणही हतबल होतो. मग प्रश्न येतो, खरंच असतो का कॅशलेस मेडिक्लेम?

बरं, ऍडमिट केल्यावर झालेल्या खर्चापैकी नॉनमेडिकलचे खर्च, उदाहरणार्थ हॅन्ड ग्लोव्हज्, रुमाल, टॅक्स व इतर खर्च हे त्या पद्धतीचा रायडर न घेतल्याने स्वतःच्या खिशातले भरायला लागतात. म्हणजे एक लाखाचं बिल झालंय आणि 15 ते 20 हजार स्वतःच्या खिशातून भरायला लागलेत. मग प्रश्न येतो, खरंच असतो का कॅशलेस मेडिक्लेम ?

साधारण विमा पॉलिसीच्या एक पर्सेंट बेड चार्जेस दिले जातात. जर आपली 5 लाखांची पॉलिसी आहे, म्हणजे 5000 बेड चार्जेस मान्य आहेत. जर आपला बेड जर 6500/- रुपये प्रतिदिन असेल तर तो मान्य असलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यामुळे सर्व चार्जेस प्रपोर्शनमध्ये कापले जातात व बरीच रक्कम ग्राहकाला खिशातून भरावी लागते. (काही पॉलिसीमध्ये मात्र ऍक्चुअल बेड चार्जेस दिले जातात. त्यामुळे क्लेमचे पैसे कापले जात नाहीत.)

कॅशलेसमुळे जोपर्यंत सँक्शन येत नाही, तोपर्यंत पेशंटला ताटकळत थांबायला लागतं. कधी कधी पेशंट डिस्चार्ज झाल्यावर पाच ते सहा तास थांबतो.

आता तर जनरल इन्शुरन्स कौन्सिलने जी रुग्णालये पॅनलवर नाहीत तेथेही कॅशलेस सुविधा मिळेल असं सांगून टाकलं. खरं तर विमा कंपनी रुग्णालयांना टर्म मान्य केल्यावर पॅनलवर आणते. मग जी रुग्णालये पॅनलवर नाहीत त्यांचे क्लेम कॅशलेस देणे विमा कंपन्यांना किती अवघड होईल हेदेखील लक्षात घ्या.

जनरल इन्शुरन्स कौन्सिल व विमा कंपनी यामध्ये ग्राहक भरडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण घोषणा तर झाली, पण योग्य नियोजन नसल्याचा फटका मात्र ग्राहकालाच बसणार आहे.

विमा कंपन्या जीप्सा या कार्यप्रणालीअंतर्गत रुग्णालयांशी करार करतात. ज्यामध्ये वैद्यकीय सेवेचे दर ठरविलेले असतात. याअंतर्गत रजिस्टर होऊनसुद्धा रुग्णालये जास्त दर आकारतात, पण विमा कंपनी जीप्साच्या दराप्रमाणे ग्राहकाचा क्लेम सेटल करते. त्यामुळे ग्राहक व रुग्णालय यांच्यात वाद होतात. यामुळेही कॅशलेस असूनसुद्धा जास्त रक्कम भरायला लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. जीप्साअंतर्गत जलद क्लेम सेटलमेंट करायची सुविधा मिळत असते.

– शक्यतो नॉनमेडिकल एक्स्पेंस रायडर पॉलिसीमध्ये घ्यावा (यामुळे थोडा प्रीमियम वाढतो.)
– कॅशलेस असल्यामुळे नियोजित ऍडमिट करावे लागत असेल तर हॉस्पिटलला डिपॉझिट वेवरची विनंती करावी किंवा जेथे डिपॉझिट घेत नाही अशा रुग्णालयात ऍडमिट व्हावे.
– जीप्साच्या अंतर्गत रुग्णालय रजिस्टर असेल तर जीप्साप्रमाणे बिल पेमेंट करू हे रुग्णालयाकडून मान्य करून घ्यावे.
– डिस्चार्जदिवशी अंतिम कागदपत्रे व बिल सकाळी लवकर टीपीएला पाठवावे म्हणजे साधारण तीन तासांत क्लेम सँक्शन झाला तर दुपारपर्यंत पेशंटला घरी जाता येईल. (फायनल सँक्शनला साधारण तीन तास कुठलीही टीपीए कंपनी वेळ घेते.)
– बेस मेडिक्लेम पॉलिसी एकतर मोठी घ्यावी किंवा घेतलेल्या बेस पॉलिसीमध्ये सर्व बिल पास होण्याची सुविधा असावी.
आधीच ग्राहकाने सर्व आव्हानांचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. आपल्याला कॅशलेसमध्ये जास्त फायदा हवा असेल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

[email protected]