सिनेविश्व – आनंदाचे पुरस्कार सोहळे

>> दिलीप ठाकूर

देखणेपण आणि कर्तृत्ववानांचा गौरव करणाऱया पुरस्कार सोहळ्यांची रेलचेल नुकतीच पुणे-मुंबईत दिसून आली. आपल्या कामाची व मेहनतीची दखल घेतल्याची सकारात्मक पावती आणि पुढील वाटचालीबद्दल जबाबदारीची जाणीव देणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यांना ग्लॅमरचे गोंडस आकर्षक वलय असते.

दोन वा कधी तीन पिढय़ांतील सिनेमावाल्यांना एकाच वेळेस एकमेकांना भेटण्याची, सहज बोलण्याची, एखादी गोष्ट जाणून घेण्याची उत्तम संधी म्हणजे मनोरंजन क्षेत्रात होणारे दिमाखदार पुरस्कार सोहळे. या सोहळ्यातील विजेत्यांचे अभिनंदन, पुरस्कारावरच्या प्रतिािढया, मनोरंजनाचे कार्पाम, रेड कार्पेटवरचा लक्षवेधक आकर्षक वावर, धडाधड उडणारे फ्लॅश, वाहिन्यांना दिले जाणारे बाईट… वातावरण निर्मिती इथूनच होत जाते. राज्य सरकार, विविध वाहिन्या, माध्यम समूह, विविध संस्था यांच्याकडून अशा पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन दरवर्षी होत असतेच.

अलीकडेच मुंबई-पुणे शहरात असे काही महत्त्वाचे पुरस्कार सोहळे रंगले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे 2021 सालापासून हा सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता. 2020च्या मराठी चित्रपटांचे पुरस्कार या सोहळ्यात सन्मानाने देण्यात आले. याच सोहळ्यात 2021, 2022 आणि 2023 सालासाठीचे काही विशेष पुरस्कार देऊन मान्यवरांना गौरविण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार रवींद्र महाजनी यांना मरणोत्तर देण्यात आला. तो गश्मीर महाजनीने स्वीकारला. उषा नाईक यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उषा चव्हाण मात्र पुण्यावरून मुंबईत आल्या नाहीत. उषा नाईक यांना या सोहळ्यात कालच्या व आजच्या चित्रपट सृष्टीकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. याच सोहळ्यात चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान या पुरस्काराने गजेंद्र अहिरे, रवींद्र साठे व नागराज मंजुळे यांना सन्मानित करण्यात आले.

तसेच या सोहळ्यात राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने हेलन व अरुणा इराणी यांनाही सन्मानित करण्यात आले. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने जे. पी. दत्ता, सोनू निगम व विधू विनोद चोप्रा यांना सन्मानित करण्यात आले. या प्रत्येकाने आपल्या यशात मुंबईचा वाटा असल्याचे आवर्जून सांगितले. यानिमित्ताने या बुजुर्गांना नवीन पिढीतील सिनेमावाल्यांना ऐकण्याची संधी मिळाली. हा जल्लोष सोहळा रात्री उशिरापर्यंत रंगला. याच सोहळ्यात सुरेश वाडकर यांना लता मंगेशकर पुरस्काराने तर अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. अशोक सराफ खूपच भावनाविवश झाल्याचे दिसून आले. हे त्यांचे खरेपण. हीच त्यांची पहिली ओळख. असे क्षण हेच अशा पुरस्कार सोहळ्याचे विशेष. त्यांच्या चौपन्न वर्षांच्या अभिनय वाटचालीचा हा विशेष गौरव.

झी महाराष्ट्राचा फेवरेट कोण? झी चित्रगौरव, झी नाटय़ गौरव, महाराष्ट्र टाइम्स सन्मान सोहळा, स्टार परिवार पुरस्कार सोहळा हे सगळे साधारण एकामागोमाग मुंबईत रंगत असतानाच पुणे शहरात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा झाला. मुंबईत थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात मराठीसह देशविदेशातील क्लासिक चित्रपट दाखविण्यात आले. म्हणजे एका बाजूला जाणकार रसिकांना उत्तमोत्तम कलाकृती पाहायला मिळाल्या. दुसरीकडे नाचगाणी, विनोदाचे पॅकेज भरपूर मनोरंजन करणारे ठरले. यात अनेक मराठी कलाकार, निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञ यांची रेलचेल पाहायला मिळाली.

झी चित्रगौरव सोहळ्यात काही कलाकारांनी मराठीतील पहिला सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे याच्या आठवणी जागवल्या. यात विशेष उल्लेखनीय गोष्ट, लक्ष्याचा अनेक वर्षांचा विश्वासू रंगभूषाकार मोहन पाठारे याला खास आमंत्रित करून त्याला बोलते केले. मटा सन्मान सोहळ्यात गायिका सुमन कल्याणपूर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यातील देशी वाणांचे जतन व संवर्धन करणाऱया राहीबाई पोपेरे यांना वसुंधरा साथी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. मटाच्या सन्मान सोहळ्यात कोणी पारंपरिक पोशाखात तर कोणी पाश्चात्त्य ढंगात येणे आणि जणू ग्लॅमरची झक्कास रेलचेल होणे अगदी स्वाभाविक. रोहिणी हट्टंगडी, वर्षा उसगावकर, अलका आठल्ये, अश्विनी भावे, किशोरी शहाणे, सोनाली कुलकर्णी यांच्यापासून प्रशांत दामले, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, प्रसाद ओक, तुषार दळवी, आदेश बांदेकर, मिलिंद गवळी, अमृता खानविलकर, अक्षया गुरव, गौरव घाटणेकर अशा अनेक नव्या जुन्या कलाकारांची रेलचेल पाहायला मिळाली.

वर्षभरात असेच आणखी पुरस्कार सोहळे, चित्रपट महोत्सव होणारच आहेत. पुरस्काराने एकीकडे आपल्या कामाची व मेहनतीची दखल घेतल्याची सकारात्मक पावती मिळते, तसेच पुढील वाटचालीबद्दल जबाबदारीची जाणीवही त्यातून होते.
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)