कवतुके दृष्टी निववावी…

>> हिमांशू भूषण स्मार्त 

मराठी नाटकाच्या प्रवासात अनेक वळणे आली, अजूनही येत आहेत आणि पुढेही येत राहतीलच. आपण प्रस्तुत लेखनाच्या प्रवासात त्यातल्या काही वळणांचा स्वभाव उकलून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा प्रवास अर्थातच कालक्रमिक नसेल. हा ऐतिहासिक आढावाही नसेल. महत्त्वाचे-बिनमहत्त्वाचे ठरवणे, मैलांचे दगड अधोरेखित करणेही नसेल. तर निवडलेल्या नाटकाला वैशिष्टय़पूर्ण बनवणाऱया नाटकीय मूलतत्त्वाचा शोध घेणे असेल.

नटनाटय़ केले तुम्ही याचसाठी,
कवतुके दृष्टी निववावी।
नाहीतरी काय कळलेची आहे,
वाघ आणि गाय लाकडाची ।

ना टकासंदर्भात लिहिताना; मग ते आस्वादनाच्या अंगाने असो वा सामीक्षिक-सैद्धांतिक अंगाने असो, तुकारामांचे वरील उद्धृत अनेक वेळा योजले गेलेले आहे. वस्तुत तुकारामांनी हा अभंगखंड काही नाटकाच्या विवेचनासाठी लिहिलेला नाही. तुकारामांनी, नाटकाचा रूपविशेष त्यांच्या मुख्य प्रतिपादनाला आधार म्हणून घेतलेला आहे. त्यांनी नाटकाचे रूपक वापरून आपला प्रतिपाद्य विषय प्रशस्त केलेला आहे. तरीही हे उद्धृत नाटय़ विचारात वारंवार प्रकटते हे उद्धृत नाटय़ विचार म्हणून आलेले नसते तरी त्यात नाटकाची प्रक्रिया उलगडलेली मात्र आहेच. या उद्धृतामध्ये नट आहे, नाटय़ आहे, कवतुक आहे, दृष्टी निवणे आहे आणि अर्थातच प्रेक्षकांकडून होणारा स्वेच्छा संशयत्यागही आहे. तुकारामांच्या उक्तीतल्या ‘तुम्ही’ या पदाने संपूर्ण रचनेचा आशय तुकारामांच्या प्रतिपाद्याकडे झुकत असला तरी आपण तूर्तास हे उद्धृत नाटकाच्या उलगडय़ासाठी प्रमाण मानू. आपण सामान्यपणे ‘कौतुक’ हा शब्द (तुकारामांचा कवतुक) ‘प्रशंसा-प्रशस्ती-वाखाणणी’ या अर्थी वापरतो, परंतु या शब्दाचा मूलार्थ ‘प्रशंसा’ हा नव्हे. कौतुकाचा मूलार्थ आहे, कुतूहल निर्माण करणारा भाव. कौतुक हे कुतूहलातून जन्मते. एका अर्थी, कुतूहल शमनाची उत्कट ऊर्जा म्हणजे कौतुक!

पुन्हा एकदा नाटकाचे रूपक वापरणाऱया तुकारामांच्या उक्तीकडे येऊ. लाकडाची गाय आणि लाकडाचा वाघ यांच्या खोटेपणाविषयीचे ठाम ‘कळणे’ त्यागून प्रेक्षक त्यांच्या सकाम वर्तनाचे रूप पाहतात ते नाटकाने त्यांना दिलेल्या संशय त्यागण्याच्या क्षमतेमुळे. नट-नाटय़ाने प्रेक्षकांना ही क्षमता प्रदान करणे आणि प्रेक्षकांकडून तिचा स्वीकार होणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हे. क्वचितप्रसंगी हे क्षमतेचे देणे अभावितपणे घडून येईल किंवा एखाद्या प्रयोगात घडेल, एखाद्या प्रयोगात नाही, परंतु मूलतः ही एक दुर्लभ गोष्ट आहे. दुर्लभ आणि दुर्गमही. दुर्लभ अशासाठी की, ती लाभण्यासाठी सायास करावे लागतात. हे सायास केवळ श्रमजीवी नसतात. दुर्गम अशासाठी की, प्रत्येक वेळी त्याकडे जाण्याचे रस्ते नव्याने शोधावे लागतात. नाटय़ार्थ आणि नाटय़ सौंदर्य प्रतिपादनाच्या-दर्शनाच्या वाटा कधीही मळत नाहीत. चांगली नाटके नटांसाठी-रंगकर्मींसाठी सदैव कवतुकाचा स्रोत असतात आणि तसाच तो प्रेक्षकांसाठीही असतो. वाटा मळल्यासारख्या वाटल्या नाटय़ार्थ, नाटय़ सौंदर्य ढळते. म्हणजे नाटय़ प्रसंगात- नाटय़ प्रयोगात हुकमीपणा आला की, सावध व्हायला हवे. करणाऱयांनी आणि बघणाऱयांनी, दोघांनीही. ठरावीक जागा वाजायला लागल्या, ठरावीक जागांवर प्रेक्षकांमध्ये उत्तेजना निर्माण होत राहिली की, सावध व्हायला हवे. असे ठरीव हुकमीपण, लाकडाच्या वाघ-गाईला कवतुकाने अनुभवण्यामधली ऊर्जा नासून टाकते. आकलनाला संमोहनाने ग्रासून टाकते.

आता थोडेसे दृष्टी निवण्याविषयी बोलू या. ‘निववणे’ या शब्दाचा अर्थ ‘शांत होणे’ असा आहे. तुकाराम म्हणतात, ‘कवतुके दृष्टी निववावी’. नाटकाच्या अनुभवातून कुतूहल शमनाची ऊर्जा निर्माण होते आणि ती शमते. म्हणजे एका अर्थी कुतूहलच शमते, पण शमणे म्हणजे विझणे नव्हे किंवा नाश पावणे नव्हे. एका शमण्याच्या शक्तीवर नव्या कवतुकाचा अनुभव घेण्यासाठी सिद्ध होणे. ज्याप्रमाणे उजेड आला की दिवा शमतो आणि पुन्हा अंधार झाला की तो प्रज्वलित होतो, तसे नाटय़निर्मित कवतुकाचे असते. ते कुतूहलाचा एक उचंबळ शमवते आणि दुसऱया उचंबळासाठी आपल्याला सिद्ध करते. म्हणूनच एका किंवा एकाच प्रकारच्या नाटकाने आपले भागत नाही. आपल्याला सुफळ नाटय़ संस्कृती लागते आणि या नाटय़ संस्कृतीत नवनव्या कवतुकांना निर्मिणाऱया नाटकीयतेचे आविष्कार लागतात. मराठी नाटकाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या लेखकांनी/दिग्दर्शकांनी/अभिनेत्यांनी/ नाटय़ तंत्रज्ञांनी ही नाटकीयता निर्माण केली. ती जोपासली. ही नाटकीयता परंपरेला पूरक, पण समकालीनतेची वाट चालणारी होती. ती बंडखोर-विद्रोही होती. जुन्या वाटा मोडणारी, नव्या वाटा चोखाळणारी होती. मराठी नाटकाला नेहमीच आतून-बाहेरून आव्हाने मिळत राहिली. विष्णुदास भावेंचे नाटक मराठीत चांगलेच स्थिरावलेले होते, परंतु त्यातले श्राव्य सूत्रधारामुखी होते. भावेंनी नाटकाचा खेळ मांडला, पण त्याचा कल अजूनही विध्यात्मकतेकडे होता. किर्लोस्करांनी तो मनोसांस्कृतिक समाधानाकडे वळवला. भावेंच्या नाटकात धर्माराधन चांगलेच प्रबळ होते. किर्लोस्करांनी धर्मसंबद्ध कथानके स्वीकारली, पण त्यांना कौटुंबिक-भावनिक वातावरणाचे कोंदण दिले. सूत्रधाराचे गाणे किर्लोस्करांनी पात्रामुखी आणले. इतकेच नव्हे तर मराठीमधले आणि मराठीच्या आप्त वर्तुळामधले भाषिक रूपबंध पदरचनांमध्येदेखील आणले. रूपबंधांच्या परिचयामुळे आलेले सुलभीकरण मराठी संगीत नाटकांमधल्या आस्वाद्यतेचे निर्माणकर्ते झाले. ही किर्लोस्करांनी केलेली भावेंच्या नाटकीय प्रवासाची प्रशस्ती होती. किर्लोस्करांच्या खूप आधी; महात्मा फुलेंनी, समाज-राजकीय स्तरावर अभिव्यक्त झालेले संहिताबद्ध नाटक साकारले. संपूर्णपणे समकालीन असणारे मानवी नाटक लिहावेसे वाटणे हा फुलेंच्या समाज-राजकीय भूमिकेचा भाग होता. या नाटकाच्या निमित्ताने मराठी नाटकाच्या आरंभकाळात घडलेले एक मोठे नाटकीय परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. भावेंच्या नाटकाला कोणतीही पूर्वनिश्चित संहिता नसे, परंतु फुल्यांनी आपल्या नाटकासाठी संहिताबद्धता आवर्जून स्वीकारली.

z [email protected]
(लेखक नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)